आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : विभागात सव्वातीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, मराठवाड्यात 1367 कोटींचे झाले कर्जवाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना या वर्षी १० जूनपर्यंत औरंगाबाद आणि लातूर विभागात १३६७ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये औरंगाबाद विभागात १ लाख ३८ हजार ७७२ शेतकऱ्यांना ५९५ कोटींचे, तर लातूर विभागात एक लाख ८७ हजार शेतकऱ्यांना ७७१ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे.
 
कर्ज भरल्यामुळे या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. या वर्षी खरीप हंगामात १० जूनपर्यंत मराठवाड्यात साडेबारा टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात सर्वाधिक तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी कर्जवाटप करण्यात आले आहे. 
 
औरंगाबाद जिल्ह्यात ६९ हजार शेतकऱ्यांना कर्ज 
औरंगाबाद जिल्ह्यात ६९१८७ शेतकऱ्यांना २४९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण २०.७४ टक्के इतके आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सर्वाधिक ६११४८ लोकांना १६१ कोटी, व्यापारी बँकेच्या वतीने ६४७९ शेतकऱ्यांना ७२ कोटी आणि ग्रामीण बँकेच्या वतीने १५६० शेतकऱ्यांना १५ कोटी ९२ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १० जून २०१६ पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ४१९ कोटींचे वाटप करण्यात आले होते. 
 
लातूरमध्ये सर्वाधिक कर्जवाटप 
लातूर जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक कर्जवाटप झाले आहे. लातूरमध्ये ९२ हजार ८८ शेतकऱ्यांना ३४८ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ८३८४२ शेतकऱ्यांना २७० कोटी, व्यापारी बँकेकडून ५८६२ शेतकऱ्यांना ५८ कोटी ११ लाख आणि ग्रामीण बँकेच्या वतीने २३८४ शेतकऱ्यांना २० कोटी १६ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी केवळ ५.७४ टक्के कर्जवाटप झाले आहे. हिंगोलीमध्ये १४९५७ शेतकऱ्यांना ५० कोटी ७७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ११८३८ शेतकऱ्यांना १९ कोटी ९० लाख, तर व्यापारी बँकेकडून २७२७ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. 
 
जिल्हामध्यवर्ती बँक कर्जवाटपात आघाडीवर 
मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आतापर्यंत लाख ६५ हजार ३७७ शेतकऱ्यांना ७१४ कोटींचे वाटप केले आहे. मराठवाड्यातल्या व्यापारी बँकांनी ५७१ कोटी ७३ लाखांचे कर्ज ५० हजार ६९९ शेतकऱ्यांना दिले आहे. ग्रामीण बँकेच्या वतीने ९७७३ शेतकऱ्यांना ८० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. 
 
परतफेड करणाऱ्यांनाही लाभ मिळावा... 
- मराठवाड्यातल्या ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले म्हणजे यांनी फक्त नवे जुने केले आहे, कर्ज मिळाल्यानंतर त्याला अधिकचे कर्ज जास्तीत जास्त २५ हजार रुपये मिळतात. त्यामुळे यांनादेखील कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले म्हणजे या शेतकऱ्यांनी फक्त कर्जमाफीच्या घोषणेच्या अगोदर कागदपत्रे देऊन रिन्यू केले आहे.
गोविंदजोशी, नेते, शेतकरी संघटना 
 
कर्जमाफीची कट ऑफ डेट निश्चित नाही 
कर्जमाफीचा निकष अजून निश्चित झालेला नाही. त्यामुळे कर्ज भरण्याची कट ऑफ डेट किती आहे हे अजूनही ठरलेले नाही. त्यामुळे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांपैकी किती जणांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, याची माहिती बँका आणि सहकार विभागाकडेदेखील नाही. 
बातम्या आणखी आहेत...