आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड ताब्यात घेण्यास प्रारंभ; आता बिल्डरांचे धाबे दणाणले, कारवाईचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- झाल्टा परिसरातील सुंदरवाडी भागात रेखांकनामधील रिकामे भूखंड हडपणाऱ्या बिल्डरांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर आता अतिक्रमण हटवून हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सिडको प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भातील अहवाल अतिक्रमण विभागाने नुकताच सिडकोच्या मुख्य प्रशासकांना पाठवला. आता खऱ्या अर्थाने कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शहरालगतच्या २८ गावांकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली. तरीही सिडकोची कुठलीही परवानगी न घेता अनेक गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध बांधकाम झाले. त्याप्रमाणेच सुंदरवाडी  परिसरातही  झाले. येथे तर ग्रामसेवकांनी चक्क खुले भूखंड बिल्डरांच्या घशात घातले.  

यातील गट क्रमांक ३१ मध्ये फ्लॉट क्रमांक ६४, ६५, ६६, ६७ मध्ये प्रथमेश कन्स्ट्रक्शनचे बिल्डर प्रफुल्ल मांडे यांनी चक्क ३५ प्लॉट बांधून विकले. ही बाब उघड झाल्यानंतर त्यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात सुरुवातीला दोन ग्रामसेवकांवर नियमबाह्य काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता या गावासह  विशेष नियोजन प्राधिकरणात येणाऱ्या २८ गावांमध्ये अनधिकृत बांधकामे पाडणे व ओपन स्पेस ताब्यात घेण्याच्या सिडकोच्या धडक मोहिमेमुळे मात्र  साऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

अधिकारी निर्णय घेतील
मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी आम्हाला गुन्हे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अनधिकृत बांधकाम व ओपन स्पेस यांच्या संदर्भातील अंतिम अहवाल मुख्य प्रशासकाना पाठविला आहे. वरिष्ठ स्तरावर याबाबत निर्णय होईल.
- गजानन सासोटे, अतिक्रमण अधिकारी, सिडको

चौकशी झाली पाहिजे
आमचे बांधकाम आता पूर्णत्वास आले आहे. तेव्हा हा दुसरा लेआऊट  आला कोठून याचे आम्हाला आश्चर्य वाटत आहे. याप्रकरणी सुरुवातीपासून चौकशी झाली पाहिजे. जे कोणी अधिकारी दोषी असतील तेदेखील समोर आले पाहिजेत. केवळ माझ्यावरच अन्याय का, असा प्रश्न मला पडला आहे.
- प्रफुल्य मांडे, डेव्हलपर,  सुंदरवाडी
बातम्या आणखी आहेत...