आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आमच्या पक्षाला का मतदान केले नाही?’ म्हणत, हल्ला करून घर जाळले; चार जणांना जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - निवडणुकीत ‘आमच्या पक्षाला का मतदान केले नाही?’ असे म्हणत गावातील कुटुंबाच्या घरावर हल्ला केला. कुटुंबातील लोकांना मारहाण करून त्यांचे  घर जाळल्याप्रकरणी  चौघांना  बीड येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी मंगळवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.     

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १८ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान पार पडले. शिरूर तालुक्यातील निमगाव मायंबा येथे माजी उपसरपंच बाबासाहेब किसन देवकर (४०), सोमनाथ जगन्नाथ देवकर (२८), ज्ञानेश्वर बबन देवकर (२९), अशोक अभिमान देवकर (२५) या चौघांनी गावातीलच अशोक महादेव कातखडे यांना ‘आमच्या पक्षाला  तुम्ही मतदान का केले नाही?’ असे विचारत जबर  मारहाण केली. सायंकाळी कातखडे यांच्या गावातील घरावर हल्ला करून दगडफेक  केली. नंतर घरात घुसून अशोक कातखडे यांच्यासह  नितीन महादेव कातखडे, मालनबाई  महादेव कातखडे अशा संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर नितीन कातखडे यांच्या राहत्या घरावर रॉकेल टाकून घर पेटवून दिले. या घटनेत घरातील कपडे, धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान, अशोक कातखडे यांच्या तक्रारीवरून गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्यात १९ फेब्रुवारी २०१२ रोजी बाबासाहेब देवकर, सोमनाथ देवकर, ज्ञानेश्वर देवकर, अशोक देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बीड  जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर  सुनावणी सुरू झाली. दरम्यान, शासनाने विशेष वकील द्यावा, अशी मागणी फिर्यादी अशोक कातखडे यांनी दीड वर्षापूर्वी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने याप्रकरणी विशेष सरकारी वकील संघमित्रा वडमारे यांची निवड केली. सर्व साक्षी-पुरावे झाल्यानंतर मंगळवारी विशेष न्यायालयाने चारही आरोपींना  दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती अॅड. अविनाश गंडले यांनी दिली. 
 
पहिलेच प्रकरण 
एखाद्या गुन्ह्यात जर शिक्षेची तरतूद १० वर्षांपेक्षा जास्त असेल व त्यात जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद असेल तर न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.या प्रकरणात तक्रारदाराचे घर जाळल्याची घटना व  अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, अशी माहिती विशेष सरकारी वकील संघमित्रा वडमारे यांनी दिली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...