आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90% भागात 8 तास वीज भारनियमन; उद्याेगांचे 100 कोटी रुपयांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एक लाख युनिट सरप्लस वीजनिर्मितीचा दावा करणाऱ्या महावितरणचे पितळ उघडे पडले असून मागणीच्या तुलनेत वीजनिर्मिती कमी होत असल्याने वीज गळतीचे जास्त प्रमाण असलेल्या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्याचा सर्वाधिक फटका औरंगाबाद शहरास बसत असून सोमवारी ८३ पैकी ३० तर मंगळवारी ६७ फीडरवर आठ तास भारनियमन केले. त्यात चिकलठाणा एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या १० फीडरचा समावेश आहे. म्हणजेच घरगुती ग्राहकांबरोबरच उद्योग, व्यवसाय ठप्प राहिल्याने सुमारे १०० कोटींच्या वर आर्थिक नुकसान झाल्याचा दावा उद्योजकांनी केला आहे. तर वीज वितरण व्यवस्था कोलमडल्याने अडीच लाखांवर वीज ग्राहक प्रभावित झाले असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

कोळसा कमी पडल्याने महानिर्मिती कंपनीला अपेक्षित वीजनिर्मिती करता आली नाही. त्यामुळे सोमवारी शहरातील जी वन ते जी थ्री गटातील ३० फीडरचा भारनियमनमध्ये समावेश होता. मात्र, सोमवारी त्यात आणखी ३७ फीडरची भर पडली. चिकलठाणा एमआयडीसीमध्ये अचानक भारनियमन सुरू केल्यामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी मंगळवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेतली आणि भारनियमन रद्द करण्याची मागणी केली. नागपूरमध्ये एक मिनिटाचेही भारनियमन नाही. फक्त औरंगाबादलाच वेठीस धरले जात आहे. हिंमत असेल तर आधी नागपुरात भारनियमन करा, असे अाव्हान उद्योजकांनी महावितरणला दिले. 

शहरातील ९० टक्के भागाचा भारनियमनात समावेश 
शहरातील९० टक्के भागाचा भारनियमनात समावेश झाल्याने सर्व गटातील अडीच लाखांवर वीज ग्राहक रडकुंडीला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘कॅशलेस इंडिया’मुळे सर्व कामे ऑनलाइन झाली आहेत. वीज नसल्याने सर्व कामे ठप्प झाली होती. 
 
अभियंता ते ऊर्जामंत्र्यांपर्यंत तक्रारीचा पाऊस; भारनियमन तातडीने बंद करा 
कुठलीहीपूर्वसूचना देता अचानक ते १२ तास भारनियमन सुरू केल्याने नागरिकांनी अभियंता ते महावितरणचे संचालक, सहव्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष संजीव कुमार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मोबाइलवर तक्रार करून भारनियमन बंद करण्याची मागणी केली. 
 
चिकलठाणा एमआयडीसीचे तासांत ४५० उद्योगांचे ३० कोटींचे नुकसान 
तब्बलतास वीज नसल्यामुळे चिकलठाणा एमआयडीसीत सोमवारी ३० ते ३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशीच परिस्थिती राहिली तर उद्याेजक देशोधडीला लागतील, अशी भीती उद्योजकांची संघटना मसिआने व्यक्त केली आहे. लोडशेडिंग लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी चिकलठाणा एमआयडीसीला मोठा फटका बसला. या ठिकाणी ४५० उद्योग असून तब्बल ३० ते ३२ हजार कर्मचारी काम करतात. मात्र, सोमवारी सकाळपासून वीज नसल्याने हे कर्मचारी रिकामेे बसून होते. यामुळे तासांत तब्बल ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायके यांनी दिली. 
 
येथे होणार आठ दिवस भारनियमन 
- गोलवाडी, मिलिंद कॉलेज, सारा सिद्धी, देवगिरी व्हॅली, एन सिडकाे, रामनगर 
- गारखेडा, चाणक्यपुरी, जालना रोड, पैठण गेट 
- आयटीआय, नाथव्हॅली, रोजाबाग, आरती, सुभेदारी परिसर, भगतसिंगनगर 
- एमआडीसी निर्लेप, हॉली क्रॉस, कॉन्टनमेंट, वसंत भवन, कोहिनूर, भीम टेकडी 
- पेठेनगर, सिटी चौक, जकात नाका, चिकलठाणा, स्टेडियम, मोंढा परिसर 
- राहुलनगर, मकबरा, पाणचक्की, रोशन गेट, नेहरू भवन, गणेश कॉलनी, 
- औ. बाद टाइम्स कॉलनी, संजयनगर, सेव्हनहिल 
- दर्गा, सिटी चौक, जमन ज्योती, दिल्ली गेट, दिशानगरी, देवळाली चौक, आयआरबी, रामगोपालनगर, विद्यापीठ, जसवंतपुरा, आझाद चौक, देवगिरी, माेरेश्वर, नारेगाव, निझामोद्दीन 
 
आठ दिवस भारनियमन? 
भारनियमन किती दिवस चालणार, याविषयी मुख्य अभियंता गणेशकर यांना विचारले असता, किमान 8 दिवस सुरू राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच ते बंद होईल, असे ते म्हणाले. फीडरनिहाय भारनियमनाची वेळ बहुतांश सकाळी 6 ते ११, ११ ते ३, 3 ते रात्री ७.३० अशी आहे. 
बातम्या आणखी आहेत...