आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगाव नगर पंचायतीवर भाजप, शिवसेना युतीची एकहाती सत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - येथील नगर पंचायतीसाठी रविवारी (१ नोव्हेंबर) मतदान घेण्यात आले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत १७ पैकी १४ जागांवर भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे या नगर पंचायतीवर आता भाजप-सेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे. मागील २५ वर्षांपासून सोयगाव ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता असलेल्या भारतीय काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. या पक्षाला केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेला खातेही उघडता आले नाही. या वेळी भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अातषबाजी करत जल्लोष केला. घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
सोयगाव ग्रामपंचायत ही नव्याने नगर पंचायत म्हणून अस्तित्वात आली आहे. या नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप-सेना युतीचे १७, काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस १२ आणि मनसे ३ व काही अपक्ष उमेदवार आपले नशीब अाजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत आपल्याच पक्षाला बहुमत मिळावे, यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, राजकीय नेत्यांनी सोयगाव शहर निवडणूक प्रचारादरम्यान पिंजून काढले होते. त्यामुळे निवडणुकीत चांगली रंगत आल्याचे दिसून आले. या नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतमोजणी बचत भवनमध्ये सोमवारी झाली. या वेळी सहा टेबलवर तीन फेऱ्यांत मतमोजणी करण्यात आली.
यात वाॅर्ड क्र. १ मधून भागवत गायकवाड (शिवसेना), रमेश गव्हाडे (काँग्रेस), वाॅर्ड क्र. २ मधून लतीफ शहा (काँग्रेस), वाॅर्ड क्र. ३ मधून वर्षा सखाराम मोरे (भाजप), वाॅर्ड क्र. ४ मधून वंदनाबाई वसंत बनकर (भाजप), वाॅर्ड क्र. ५ मधून योगेश मानकर (भाजप), वाॅर्ड क्र. ६ मधून कैलास काळे (भाजप), वाॅर्ड क्र. ७ मधून मनीषा चौधरी (शिवसेना), वाॅर्ड क्र. ८ मधून युवराज आगे (भाजप), वाॅर्ड क्र. ९ मधून मंगलाबाई राऊत (काँग्रेस), वाॅर्ड क्र.१० मधून अनिताबाई तडवी (भाजप), वाॅर्ड क्र.११ मधून प्रतिभा बोडखे (शिवसेना), वाॅर्ड क्र. १२ मधून छाया रवींद्र काटोले (शिवसेना), वाॅर्ड क्र. १३ मधून सुनील आत्माराम तिडके (काँग्रेस), वाॅर्ड क्र. १४ मधून योगेश पाटील (शिवसेना), वाॅर्ड क्र.१५ मधून सुलताना देशमुख (भाजप), वाॅर्ड क्र. १६ मधून भगवान इंगळे (शिवसेना), वाॅर्ड क्र. १७ मधून शोभाबाई मोरे (भाजप) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
हाणामारीमुळे बंदोबस्त
मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यकर्ते व सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे शहरात अधिक पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यामुळे बसस्थानक परिसर, बचत भवनाला मतदानाच्या दिवशी जत्रेचे स्वरूप आले होते.
- बचत भवनामध्ये सहा टेबलवर मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू.
- निकाल ऐकण्यासाठी पंचायत समिती मैदानावर हजारो नागरिकांची गर्दी
- मतमोजणीचा पहिल्या फेरीचा निकाल अवघ्या दहा मिनिटांत लागला. यात ५ जागांवर भाजप-सेना, तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.
- तीन टप्यात झाली मतमोजणी