आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो, ढोपरं-कोपरं फुटेपर्यंत खेळा; लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा मंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आजकालचे पालक अगदी बसस्टॉपवरही मुलांच्या परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीची भाषा करतात. अहो, त्यांना टक्के, टोणपे खाऊ द्या. मुलींनो अगदी ढोपरं-कोपरं फुटेपर्यंत खेळा. ड्रेसला माती लागू द्या. अन् शिक्षकांनो तुम्ही त्यांच्या करिअरची चिंता करू नका. कॅरेक्टर बिल्डिंगची चिंता करा, असा मंत्र लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विद्यार्थिनींसह शिक्षक-पालकांना दिला. 

सरस्वती भुवन संस्थेच्या श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेचा शतकमहोत्सव सांगता समारंभ सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, स. भु. संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, उपाध्यक्ष जवाहरलाल गांधी, सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, सहचिटणीस श्रीरंग देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

1916 साली गोकुळाष्टमीच्या दिवशी शारदा मंदिर शाळा सुरू झाली. 2016 साली शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाले. त्याचा सांगता साेहळा लोकसभा अध्यक्ष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला. त्यांनी जणू आपण शारदा मंदिरच्या विद्यार्थिनी आहोत या जिव्हाळ्याने मुलींसमोर भाषण केले. त्या म्हणाल्या की, खरे तर मी या समारंभाला येणार नव्हते. मात्र दादासाहेब इधाटे दिल्लीत भेटले अन् म्हणाले, सरस्वती भुवन संस्थेचे निमंत्रण आले आहे ना? अशा संस्थांना नाही म्हणायचं नसतं. माणसांनी झिजून संस्था उभी केलीय. त्यामुळे मी आज इथे आहे. जयवंतीबेन मेहता या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांची आज खूप आठवण झाली. स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा शाळेच्या विद्यार्थी म्हणून आल्या. वयोवृद्ध रत्नप्रभा गोगटेताई आल्या. डॉ. सविता पानट यांचे मनोगत आवडले. देणगीचा चेक देऊन गेल्या. संस्थेप्रती विद्यार्थिनींची ही आपुलकी पाहून मी भारावले, असे महाजन म्हणाल्या. 

खूपखेळा, ड्रेस मळू द्या : मुलींनोतुम्ही अभ्यासाची फार काळजी करू नका. दररोज भरपूर मैदानी खेळ खेळा. ड्रेसही मळू द्या, ढोपरं-कोपरं खेळताना फुटू द्या. शाळेत शिक्षक म्हणतात ड्रेस मळवू नका, घरी आई रागावते, ड्रेस मळाला तर मी धुणार नाही तरीही मनसोक्त मस्ती करा. खेळाने अनेक गुण तुमच्या अंगी येतील. मीपणाची भावना जाऊन सांघिक भावना खेळाने येते, असा सल्लाही त्यांनी मुलींना दिला. 

अजूनही मराठी कविता पाठ आहेत 
सुंदरसभामंडप, सभोवार निळा कोट, पांढऱ्या साड्या घातलेल्या शिक्षिका अन् मध्यभागी शालेय पोशाखात मोठ्या उत्साहाने बसलेल्या छोट्याशा विद्यार्थिनींना पाहून महाजन यांनाही आपल्या शालेय जीवनाची आठवण झाली. त्या म्हणाल्या, मला आजही शाळेतल्या कविता आठवतात. पक्षिणी, फुलराणी या कविता मी आजही म्हणू शकते. पृथ्वीचं प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची कविता तर तोंडपाठ आहे. 
बातम्या आणखी आहेत...