आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महाराष्ट्र केसरी’ला नाेकरी देण्याचे अाश्वासन हवेतच; मुख्यमंत्र्यांनी दिला हाेता शब्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सलग तीन वेळेस महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारे जळगाव जिल्ह्यातील मल्ल विजय चौधरी यांना सात दिवसांत शासकीय सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ५० दिवसानंतरही हवेतच विरली आहे. या कामासाठी चौधरी यांचे वडील नियमितपणे मंत्रालयाचे उंबरठे झिजवत अाहेत, मात्र त्यांची निराशा हाेत अाहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. जितेेंद्र देहाडेही दररोज ट्विटरवर मुख्यमंत्र्यांना या कामाची अाठवण देत अाहेत, मात्र अापल्या एकाही टि्वटला अद्याप उत्तर मिळालेले नसल्याचे त्यांचे म्हणणे अाहे.

नागपूर येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाैधरी यांचे अभिनंदन करुन त्यांना सात दिवसांत शासकीय नाेकरी देण्याची घाेषणा केली हाेती. तसेच चाैधरी यांना एशियन गेम्स आणि आॅलिम्पिक स्पर्धेसाठी मदतीचे अाश्वासनही दिले हाेते. याच अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही चाैधरी यांचे अभिनंदन करुन त्यांना सरकारतर्फे सर्वताेपरी मदत करण्याचे अाश्वासन दिले हाेते. मात्र सरकारकडून करण‌्यात अालेल्या या घाेषणांची ५० दिवसानंतरही अंमलबजावणी झालेली नाही.
 
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्र्यांच्या घाेषणेचा पुनरुच्चार केला हाेता.  चौधरींना क्लास वन अधिकारीपदी सेवेत घेण्याची घोषणा महाजन यांनी केली होती. याबाबतचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला असून दोन दिवसात नियुक्तीचे आदेश निघतील, असेही सांगण्यात अाले हाेते. मात्र त्यांचीही घाेषणा हवेतच विरली असल्याचे दिसून अाले अाहे.

नियमांत बसण्याची अडचण
काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. देहाडे यांनी अाजवर ४९ वेळेस मुख्यमंत्र्यांना चौधरींना नोकरी देण्याबाबतच्या आश्वासनाची आठवण करून दिली. मात्र त्याला उत्तर मिळाले नाही. चाैधरींचे वडील मंत्रालयात चकरा मारतात. मात्र त्यांची एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर पाठवणी केली  जातेय. नियमात बसत नसल्याने चाैधरींना नियुक्ती देण्यात अडचण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...