आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न होते 24 तास अखंड वीजपुरवठ्याचे, वाऱ्याची हलकी झुळूक आली तरी खंडित होतो वीजपुरवठा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील वीज वितरण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी राबवलेल्या १६९ कोटी खर्चाच्या ड्रम प्रकल्पाचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे वीज वितरण व्यवस्था मरणावस्थेत जाऊन पोहोचली आहे. ८० टक्के वितरण प्रणालीचे आयुर्मान संपले. त्याामुळे हवेची झुळूक आली तरी वीजपुरवठा खंडित होत आहे. 
 
२००५ मध्ये शहर विभाग एक दोनसाठीच्या ड्रम प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. केंद्र सरकारने त्यासाठी १६९ कोटींचा निधी दिला. मात्र, शहर दोनमध्ये तो राबवलाच नाही. त्याऐवजी वाळूजला नियमबाह्य कामे करून प्रकल्प गुंडाळला. त्यामुळे वीज वितरण प्रणाली कोलमडली आहे. 
 

ड्रमची चौकशी गुलदस्त्यातच 
तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटलांनी ड्रम प्रकल्पातील नियमबाह्य कामाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर महावितरणने चौकशी लावली होती. मात्र, त्यापुढे काहीच झाले नाही. 

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी 
मुख्य अभियंता सुरेश गणेशकरांकडे विचारणा केली असता त्यांनी अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांच्याकडे बोट दाखवले. अग्रवाल म्हणाले, मला काही सांगता येणार नाही. ते खूप जुने प्रकरण आहे. 
 
४८ हजार वीज मीटरवर हातोडा 
ड्रमअंतर्गत शहर एकमध्ये ४१ हजारांवर विद्युत मीटर बदलून एल अँड टी कंपनीने नवीन इलेक्ट्रॉनिक विद्युत मीटर बसवले होते. जीटीएलने त्यावर हातोडा घालून ४८ हजार १३३ मीटर स्क्रॅपमध्ये फेकले. 
 
अखंड पुरवठ्यासाठीचे आरएमयू झाले कचराकुंडी 
अखंडित वीजपुरवठ्यासाठी ड्रम प्रकल्पांतर्गत शहर विभाग एकमध्ये १५९ रिंग(आरएमयू)मेन युनिट बसवले होते. त्यापैकी फुले चौक ते एमटीडीसी, शहागंज, हर्सूल, छावणी, काळा दरवाजा येथील ४० पेक्षा अधिक संच बंद पडले. चोरांनी त्याची तोडफोड करून साहित्य पळवले. हे संच कचराकुंडी बनले आहेत. 
 
हे दाखवले होते स्वप्न 
- जोराचा वादळवारा, पाऊस आला तरी वीज वितरणात कोणताही व्यत्यय येणार नाही. 
- कोणत्याहीवातावरणात शहरातील विद्युत पुरवठा अखंडित राहील. त्यामुळे औरंगाबादकरांना २४ तास वीज मिळेल. 
- शहरातील वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यात येतील. त्यामुळे जागोजागी लटकलेल्या विजेच्या तारा दिसणार नाहीत. 
- रस्त्याच्या मधोमध उभे असलेले खांबही नसतील. त्यामुळे अखंड वीजपुरवठ्याबरोबरच शहराचे सौंदर्यही वाढेल. 
- अद्ययावत विद्युत संच, नवीन रोहित्रे विद्युत वाहिन्या टाकल्यामुळे पुढील ५० वर्षे शहराचा वीजपुरवठा सुरळीत राहील. 
 

ही आहे वस्तुस्थिती 
- ग्राहकांच्या संख्येनुसार रोहित्रांची संख्या नाही. उपविभाग नाहीत. 
- दोन खांबांच्या मध्ये जीर्ण वाहिन्यांना जागोजागी काड्यांचा आधार देऊन जोड दिले. 
- एकाच खांबावर मीटर वाहिन्यांचे जाळे तयार झाले. वाहिन्या खांब जमिनीकडे झुकले आहेत. 
- ३० हजारांवरइमारतीला विद्युत वाहिन्या चिकटलेल्या दिसून येतात. 
- ८०% विद्युतवाहिन्या, खांब, रोहित्रांचे आयुर्मान संपले आहे. 
- १६९ कोटींच्या ड्रम प्रकल्पाचा बट्ट्याबोळ 
- शहरातील ८० टक्के विद्युत वितरण प्रणालीचे आयुर्मानही संपले 
 
 
बातम्या आणखी आहेत...