आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांगीरबाबांच्या यात्रोत्सवास शेंद्रा येथे आजपासून प्रारंभ; मध्यरात्री महाआरतीने सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- औरंगाबाद शहरापासून जालना महामार्गावर अवघ्या पंधरा किमी अंतरावर असलेल्या शेंद्रा कमंगर येथील मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मांगीरबाबा यांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. १४) मध्यरात्रीला महाआरतीने सुरुवात झाली आहे.  

शेंद्रा कमंगर हे गाव अंदाजे तीन हजार लोकवस्तीचे आहे. या गावात सर्व समाजांची घरे आहेत. पूर्वी एमआयडीसी व आता डीएमआयसीमुळे हे गाव जगाच्या नकाशावर आले आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी येथे भटक्या समाजाची यात्रा भरते. तशीच यात्रा शेंद्रा येथे मातंग समाजाची भरते. शेंद्रा येथे मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मांगीरबाबांचे देवालय आहे. अख्ख्या महाराष्ट्राबरोबर आंध्र, तेलंगणा व शेजारील कर्नाटक राज्यातील मातंग समाज भक्तिभावाने या यात्रेला येतो. चैत्र शुद्ध पंचमीला म्हणजे शनिवारी (दि. १५) या यात्रेला प्रारंभ होईल. तत्पूर्वी शुक्रवारी मध्यरात्री देवस्थान समितीच्या वतीने महापूजा होऊन यात्रेला सुरुवात होइल. 

यात्रेकरुंसाठी जय्यत तयारी...
यात्रेकरूंना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मांगीरबाबा देवस्थान समिती, शेंद्रा ग्रामपंचायत व प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व यात्रेकरूंना वेळेवर पाणी मिळावे म्हणून देवस्थान समितीने दहा व ग्रामपंचायतीने पाच अशा एकूण १५ टँकरची व्यवस्था केली आहे. गर्दीचे ठिकाणी असलेल्या आठ जागी चोवीस तास पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली असून चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था महावितरणने केली आहे.  आतापासूनच दुकाने थाटली असून लहान मुलांचे आकर्षण असलेल्या रहाट पाळण्यांची उभारणी चालू आहे.

यात्रा हाऊसफुल असेल...
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धान्यही भरपूर आले आहे. त्यामुळे यात्रा हाऊसफुल्ल असेल. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळामुळे यात्रा रोडावली होती. मात्र, यावर्षी पाच लाखांवर यात्रेकरू येतील.मागील वर्षी अंदाजे पाच हजार बोकडांचा बळी देऊन भाविकांनी आपला नवस पूर्ण केला. यावर्षी त्यात निश्चित वीस टक्क्यांपेक्षा जास्त भर पडेल.-भास्करआबा कचकुरे, अध्यक्ष, मांगीरबाबा देवस्थान समिती, शेंद्रा.  

तगडा पोलिस बंदोबस्त...
यात्रा शांततेत पार पडावी यासाठी १५५ पोलिस कर्मचारी, १५ पोलिस अधिकारी व दंगा नियंत्रण पथकाची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद- जालना या मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...