आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनाेधैर्य’तील पीडितांना अाकस्मिक निधीतून मदत, मुनगंटीवार यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, नाशिक - बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या मदतीसाठी तयार केलेल्या पण लालफितीच्या कारभारात अडकलेल्या मनोधैर्य योजनेचा तिढा सुटण्याची चिन्हे अाहेत. अशा पीडितांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केले अाहे. तसेच ट्रॉमा टीमच्या रखडलेल्या प्रशिक्षणासाठी ८३ लाख रुपये देणार असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले.

निधीअभावी राज्यात ९८२ बलात्कारपीडित मदतीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले होते. या मदतीसाठी एप्रिल महिन्यात महिला व बालकल्याण आयुक्तालयाने पाठवलेला ६० कोटींचा प्रस्ताव धूळ खात पडला होता. अर्थमंत्री मुनगंटीवार व महिला बालविकासमंत्री पंकजा यांच्या टाेलवाटाेलवीमुळे पीडितांना मदत मिळत नव्हती. या बातमीची दखल घेत मुनगंटीवार व मुंडे या संबंधित खात्याच्या मंत्र्यांची शुक्रवारी बैठक झाली. अपर मुख्य सचिव संजयकुमार, लेखा व कोशागार विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांचीही उपस्थिती होती. पीडितांना आधार देण्यासाठी शासन आदेशात नमूद ‘ट्रॉमा टीम’ ही अद्याप निधीअभावी कार्यरत झाली नव्हती. या प्रशिक्षणासाठी ८३ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय बैठकीत झाला. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यावर सात दिवसांत जिल्हा मंडळाची बैठक व्हावी तसेच पोलिस, वैद्यकीय व संरक्षण अधिकाऱ्यांच्या ट्रॉमा टीममध्ये समावेशावर बैठकीत चर्चा झाली.
लाभ १५ दिवसांत
पीडित महिला व बालकांना योजनेअंतर्गत मंजूर प्रकरणाचा लाभ १५ दिवसांत देण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी दिले. अर्थमंत्र्यांनी तत्काळ निधी देण्याचे मान्य केले असून, उर्वरित प्रकरणांत तत्काळ निर्णय घेऊन माहिती पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...