आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चा : मोठ्या उत्साहाने गेलो होतो, नाराजीत परतलो...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता मुंबईतील मराठा क्रांती मूकमोर्चा विराटच होणार हा ठाम विश्वास होता. झालेही तसेच. प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाला होता. जाताना सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, परंतु परतताना सर्वांच्याच चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. कारण पदरी फारसे काही पडले नाही. मागण्या मान्य होत असल्याची घोषणा होईल, असे सर्वांना अपेक्षित होते. परंतु पुन्हा त्याच जुन्या पठडीतील घोषणा सरकारकडून झाली. 
 
शासनाकडून काय निर्णय घेतले जातात याकडे आता काही दिवस लक्ष ठेवून असू. त्यानंतर पुढे काय करायचे याचा निर्णय घ्यावा लागेल. आम्ही घाईत निर्णय घेणार नाही, असे औरंगाबादच्या मोर्चेकऱ्यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी औरंगाबादेतच मराठा क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली होती. एका वर्षात या मोर्चाने राजधानीत धडक मारली. औरंगाबादेत जी शिस्त होती ती शेवटपर्यंत कायम राहिल्याचा औरंगाबादच्या संयोजकांना अभिमान आहे. त्यामुळे औरंगाबादेतून जास्तीत जास्त गर्दी कशी होईल यासाठी प्रयत्न झाले. मुंबई मोर्चाचे नियोजनही जबरदस्त होते. लाखो मराठे अतिशय शिस्तीत मुंबईत मार्गक्रमण करत होते. मोर्चा संपला तरीही राज्यभरातून लोंढे येतच होते. समाजाचे सर्व राजकारणी यात सहभागी झाले, परंतु व्यासपीठावर त्यातील एकालाही प्रवेश नव्हता. अन्य मोर्चांप्रमाणेच येथेही मुलींनीच नेतृत्व केले आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 
 
राज्यभरातील मराठा समाज राजधानीत एकवटल्याने मुख्यमंत्र्यांकडून ठोस निर्णय जाहीर केला जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. आरक्षणाचा मुद्दा आयोगाकडे पाठवून दिला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे असावीत ही मागणी मान्य केल्याचे दिसत असले तरी घोषणा करताना खुल्या प्रवर्गासाठी वसतिगृहे असा शब्द वापरला गेला आहे. म्हणजेच ही वसतिगृहे फक्त मराठा मुला-मुलींसाठी असणार नाहीत, तर खुल्या प्रवर्गातील अन्य मुलांनाही तेथे प्रवेश असेल. यात पुन्हा मराठा विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे नाराजी असल्याचे मूळ संयोजकांपैकी काहींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय काय निघतात याकडे आता आमचे लक्ष राहणार आहे. त्यानंतरच खरी प्रतिक्रिया देता येईल. त्यात समाधान झाले नाही तर पुन्हा आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल, असेही सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...