औरंगाबाद - मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ संत साहित्यिक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांनी व्हिडिओ भाषणातून व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोमवारी (२७ फेब्रुवारी) त्यांचे प्रमुख भाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते.
साहित्य, संगीत, चित्र, नाट्य लोककला आदी पाच क्षेत्रांच्या माध्यामातून ज्यांनी मराठी भाषेचा गौरव केला अशा दहा मान्यवरांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना पठाण यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुसुमाग्रजांनी कशा पद्धतीने मदत केली, याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यापीठाच्या मराठी विभागातील अनेक सहकाऱ्यांनी विश्वात नाव कमावले, शिवाय मराठीचा गौरव करण्यातही त्यांचा वाटा आहे.
अभिजात मराठीसाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशविदेशातून हजार पोथ्या संकलित करण्याचे मोठे काम आपण केले आहे. सध्या संपूर्ण विश्वाचे लक्ष मराठी भाषेकडे असल्याचे डॉ. पठाण यांनी म्हटले. कुलगुरू म्हणाले, मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये मराठवाड्याचा देखील मोठा वाटा आहे.
सर्वाधिक बोलली जाणारी मराठी भाषेचा जगात १९ वा क्रमांक आहे.’ या वेळी प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. मधू जामकर, पंडित विश्वनाथ ओक, मुरली लाहोटी, प्रा. दिलीप बडे, मीरा उमप, प्रा. दिलीप घारे यांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय प्रा. अजित दळवी यांच्या वतीने अनुया दळवी, निरंजन भाकरे यांच्या वतीने शेखर भाकरे, पंडित नाथराव नेरळकर यांच्या वतीने अनंत नेरळकर यांनी सन्मानचिन्ह, ग्रंथाच्या रूपात सन्मान स्वीकारला.
‘आत्मवाणी-अमृतवाणी’नेरंगत वाढवली : उत्तरामोने प्रस्तुत ‘आत्मवाणी-अमृतवाणी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. मराठी भाषेचा उगम ते आजपर्यंत झालेला प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात आला. अभिनेते सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, प्रख्यात गायिका उत्तरा केळकर, श्रीधर फडके, मंगेश बोरगावकर, आर्या अंबेकर, चिन्मय केळकर, कमलाकर सातपुते मीरा मोडक आदींनी सादरीकरण केले.
विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ संत साहित्यिक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पुढील स्लाईड क्लिक करून संपूर्ण बातमी वाचा...