आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ. भा. मराठी साहित्य संमेलन स्थळावरून विदर्भ-मराठवाड्यात जुंपण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्थानावरून विदर्भ साहित्य संघ व  मराठवाडा साहित्य परिषद यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे. साहित्य महामंडळाचे छत्तीसगडचे  कपूर नामक सदस्य बैठकीला उपस्थित राहू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला नसता तर त्याच बैठकीत संमेलन बडोद्याला दिले गेले असते, असा गौप्यस्फोट महामंडळाचे मराठवाड्यातील सदस्य प्रा. डा. दादा गोरे यांनी केला.

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचीच संमेलन बडोद्याला व्हावे अशी इच्छा होती  व त्यांनी कौशल्याने हे सारे घडवून आणल्याचा आरोप काही साहित्यिकांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे. हिवरा आश्रमवर अंनिसने आरोप करण्यामागेही मराठवाडा साहित्य परिषदेचा हात होता, असेही आरोप आहेत. त्या संदर्भात ठाले पाटलांशी संपर्क केला; पण ते अंदमानला असल्याने संपर्क झाला नाही. महामंडळाचे सदस्य असलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रा. दादा गोरे यांनी मात्र, हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, महामंडळाच्या बैठकीत बडोदा आणि हिवरे आश्रमला सारखीच आठ मते पडली होती. अध्यक्षांनी निर्णायक मत देऊन संमेलन विदर्भाकडे वळवले. छत्तीसगडचे एक प्रतिनिधी बैठकीला येऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला, अशी आमची माहिती आहे. ते आले असते तर निर्णय बडोद्याच्याच बाजूने गेला असता. कारण कपूर नामक हे सदस्य बृहन्महाराष्ट्राच्याच बाजूचे आहेत. जर घटक संस्थाच संमेलन मागत असेल तर तिलाच संधी दिली पाहिजे, या मताचे ते आहेत. बडोद्याच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचेही मत तेच आहे. त्यात मराठवाड्यातील तिघांसह हैदराबादच्या विद्या देवधर, कर्नाटकातील भालचंद्र शिंदे, पुण्याचे अविनाश पायगुडे, बडोद्याचे दिलीप खोपकर यांचा समावेश होता. हिवरेबाजारच्या बाजुने महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, नागपूरचे इंद्रजित ओरके आणि विलास देशपांडे,  भोपाळचे सुधाकर भाले, मुंबईच्या उषा तांबे आणि अनुपमा असगरे आणि पुण्याचे मिलींद जोशी आणि पद्माकर कुळकर्णी हे आठ सदस्य होते. त्यामुळे केवळ मराठवाड्याच्या सदस्यांची इच्छा बडोद्याला संमेलन द्यावे अशी होती या म्हणण्यात अर्थ नाही, असेही दादा गोरे म्हणाले. 
 
घटना तपासू : जाेशी
महामंडळाच्या घटनेतील तरतूदी तपासून संमेलनाच्या स्थळाबाबत निर्णय घेऊ, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जाेशी म्हणाले. मात्र स्थळ लवकर जाहीर झाले नाही तर विदर्भ विरुद्ध मराठवाडा हा नवा वाद वाढण्याची शक्यता आहे.  
बातम्या आणखी आहेत...