आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : कृषी विद्यापीठाने विकसित केली हिरव्या चाऱ्यांची बँक, 418 शेतकऱ्यांनी घेतला लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - दुष्काळ, अत्यल्प सिंचन सुविधा आणि नगदी पिकांकडे कल वाढल्याने चाऱ्याची टंचाई वाढत चालली आहे. ती दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे तसेच कोणत्या प्रकारचा चारा पिकवला जाऊ शकताे, याची शास्त्रोक्त माहिती मिळावी, यासाठी  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २०१६ मध्ये १२.५ एकरवर २३ प्रकारच्या हिरव्या चाऱ्याची राज्यातील पहिली बँक विकसित केली आहे. येथे मार्गदर्शनासोबत बियाणे, ठोंबही उपलब्ध होते.
 
गौ पैदास प्रकल्पाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपकसिंग चौहान यांनी  सांगितले की, विद्यापीठाने २०१५ मध्ये चारा पिकांची बँक तयार करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कृषी संशोधन संस्था, देशातील विविध विद्यापीठे, धारवाड, झाशी येथील चारा पिक अनुसंसाधन केंद्रातून चाऱ्याचे ठोंब व बियाणे आणले. सध्या साडेबारा एकरवर चारा उभा आहे. येथे बँकेत २३ जातीचे बियाणे व ठोंब प्रती एक रूपया दराप्रमाणे मिळतात.
 
४१८ शेतकऱ्यांनी घेतला लाभ
गेल्या वर्षभरात ४१८ शेतकऱ्यांनी चारा बँकेला भेट देवून माहिती घेतली. त्यांनी जयवंत, धारवड नेपीयर, मारवेल, पॅराग्राम, फुले रूचिरा, स्टायलो, ओट या चारा पिकांचे ठोंब व बियाणे खरेदी करून लागवडही केली. जून ते ऑगस्ट तसेच मार्च ते एप्रिल दरम्यान ठोंबाची लागवड करता येते. पहिली चारा काढणी ९० दिवसांत, त्यानंतर ४५ ते ६० दिवसांत होते. ६ ते ८ कापण्या घेता येतात. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून चारा लागवड करावी, असे आवाहन डॉ. चौहान यांनी केले.
 
पाण्याचा ताण सहन करत
पाण्याचा ताण सहन करत २४ ते ४० अंश सेल्सियस तापमानात चांगली वाढ होणाऱ्याच जाती बँकेत उपलब्ध आहेत. प्रति वर्षी ८ ते ९ कापण्यामध्ये २ हजार ते अडीच हजार क्विंटल उत्पादन मिळते, अशी माहिती संचालक (संशोधन) डॉ. दत्तप्रसाद वास्कर,  पशुवैद्यकीय अधिकारी संदेश देशमुख यांनी दिली.
 
चारा बँकेतील चाऱ्यांच्या जाती अशा 
{फुले गुणवंत {फुले जयवंत {धारवाड  {लुसर्न{न्युट्रीफीड {फुले जयवंत {बहुवार्षिक ज्वारी {शुगर गेज {स्टायलो {बरशीम {सीओबीएन ५  {फुले गोवर्धन (मारवेल) {ओट {आयजीएफआरआय {अंजन गवत {ज्वारी {बीएनएफ -१० {धामण गवत {सीओ-३ {मख्खन गवत {ग्री निग्रास {पॅराग्रास {दशरथ
बातम्या आणखी आहेत...