आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरातील 364 बेकायदा अतिक्रमणावर मार्किंग, व्यावसायिकांत खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वैजापूर - नगरपालिकेने शहरातील  शिऊर-श्रीरामपूर रस्त्यावर वीज वितरणचे कार्यालय ते आंबेडकर पुतळा परिसरात लहान-मोठ्या  व्यावसायिकांनी अनेक महिन्यांपासून दुतर्फा बाजूने  बेकायदा अतिक्रमण थाटले. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी या मार्गावरील ३६४ बेकायदा अतिक्रमणावर मार्किंग करण्याची कारवाई केली.
 
पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी  दोन महिन्यांपूर्वी पालिकेला शहरातील बेकायदा अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार शिऊर-श्रीरामपूर रस्त्यावर विद्युत महावितरण कंपनी कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात टपऱ्या, पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केल्याचे समोर आल्याने ही अतिक्रमण काढण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  गटार व फुटपाथवर अनेक व्यावसायिकांनी  कब्जा केल्यामुळे पालिका प्रशासनाला या मार्गावरील गटार स्वच्छ करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.  वीज महावितरण कंपनी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून बेकायदेशीर टपऱ्या टाकून परिसर ताब्यात घेतला आहे.
 
व्यावसायिकांत खळबळ  : रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांनी थाटलेल्या टपऱ्या, पत्र्याचे शेड यावर बुधवारी  उपमुख्याधिकारी पी. ए. पाटील यांच्या नेतृत्वात  कर्मचारी  एम. एन. साळवे, सुधाकर आंबेकर यांनी जवळपास ३६४ ठिकाणी  अतिक्रमित दुकानावर लाल रंगाचे मार्किंग केले. बेकायदा अतिक्रमणावर  बुधवारी लाला रंगाच्या खुणा मारण्याची कारवाई केल्यामुळे व्यावसायिकांत खळबळ उडाली असून अतिक्रमणावर कारवाईचा हातोडा पडण्याच्या धास्तीने सायंकाळच्या सुमारास पालिका कार्यालयात गर्दी केली होती. मात्र, वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे आल्यापावली त्यांना माघारी जावे लागले. 
 
अतिक्रमणे हटवणार  : पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांनी पालिका क्षेत्रातील नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्यासह विविध शासकीय मालमत्तेवर अवैधरीत्या थाटलेले अतिक्रमण हटवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेची निवडणूक नगराध्यक्षांच्या आरक्षण प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे पालिकेवर गेल्या २८ डिसेंबरपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
बातम्या आणखी आहेत...