आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील नाराजीमुळे भाजपचे घडामोडे अस्वस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापौरपदाचे भाजपचे उमेदवार भगवान घडामोडे यांनी धसका घेतला आहे. ऐनवेळी काही दगाफटका तर होणार नाही ना या शंकेने त्यांनी सोमवारी स्वत: शिवसेनेतील नाराज नगरसेवकांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
घडामोडे यांची भाजपकडून महापौरपदाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सेनेत अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. कारण सेनेने आधीच उपमहापौरपदाचा उमेदवार जाहीर केला. घडामोडे यांची उमेदवारी शनिवारी जाहीर झाली अन‌् त्यांनी लगेच उमेदवारी अर्ज भरला. नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात त्यांचा रविवार गेला. या सहलीत शिवसेनेतील नाराज नगरसेवक सहभागी झाले नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या घडामोडे यांनी सोमवारी सकाळपासूनच नाराज नगरसेवकांचे घर जवळ केले. मतदानाच्या वेळी गडबड होणार तर नाही ना, याची चाचपणी केली.

आमची नाराजी पक्षांतर्गत आहे, पक्षातील भांडण आहे, आम्ही पक्षही सोडणार नाही की राजीनामेही देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा, असे आश्वासन सर्वांनीच घडामोडे यांना दिले. तरीही घडामोडे या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. या नगरसेवकांनी सहलीवर जावे, त्यांना इतरांसमेवत जायचे नसेल तर वेगळी व्यवस्था करतो, असे घडामोडे यांनी सेना नगरसेवकांना सांगितले. परंतु ज्येष्ठ असो वा नवखे या सर्वांनीच सहलीवर जाण्यास नकार दिला. आम्ही मतदान करणार आहोत, पण सहलीवर मात्र जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

घोगरे निश्चिंत
दरम्यान काही नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असली तरी उपमहापौरपदाच्या सेनेच्या उमेदवार स्मिता घोगरे या निश्चिंत आहेत. काहीही झाले तरी नगरसेवक आपल्यालाच मतदान करतील, असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडून घडामोडेंसारखे नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. पक्ष पाठीशी असल्याची त्यांना खात्री आहे.

ही तर सदिच्छा भेट
नाराज नगरसेवक सहलीवर गेल्यास त्यांची नाराजी कमी होईल, अशी घडामोडे यांची अटकळ होती. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे घडामोडे यांनी पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांना विनंती करून सेना नगरसेवकांना विनंती करण्यास सांगितले. त्यातही यश आले नाही. सेना नगरसेवकांनी घडामोडे यांना मतदानाचे आश्वासन दिले असले तरी ते काहीसे अस्वस्थ आहेत. सेना नगरसेवकांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे घडामोडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...