आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजीनामा आदेशानंतर मनपात सन्नाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘गेले काही दिवस मी बाहेरच होतो, परंतु येत्या सोमवारपासून मी नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. पालिका मुख्यालयात नागरिकांसाठी उपस्थित असेल अन् मोबाइलवरही’ हे वक्तव्य आहे, महापौर त्र्यंबक तुपे यांचे. शुक्रवारी त्यांनी महापौरांच्या शासकीय ‘रायगड’ बंगल्यावर दिवाळी स्नेहमिलनात ते बोलले. तोपर्यंत त्यांना राजीनाम्याचा आदेश आला नव्हता. उलट पुढील वर्षभर महापौरपदी राहण्याचे संकेत त्यांनी दिले. दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण सभा झाली. तेव्हाही निरोप नव्हता. त्यामुळे सोमवारपासून नव्या जोमाने कामाला लागण्याचे आडाखे त्यांच्याकडून बांधले जात असतानाच सोमवारी सकाळी ‘राजीनामा द्या’ असा आदेश धडकला. त्याचे पडसाद सोमवारी पालिका मुख्यालयात दिसून आले. महापौर तुपे मुख्यालयात आलेच नाही. मात्र उपमहापौर प्रमोद राठोड यांनी हजेरी लावली. अन्य पदाधिकारीही आले नाही. एकूणच सोमवारी पालिका मुख्यालयात सन्नाटा होता.
महापौर उपमहापौर कधी राजीनामा देणार या चर्चेने गेला महिना पालिका वर्तुळ व्यापून टाकले होते, परंतु जसजसा कालावधी वाढत गेला तसतशी ही चर्चाही थंडावत गेली. शनिवारी सर्वसाधारण सभेत महापौर तसेच उपमहापौरांचा राजीनामा झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र होते, परंतु रविवारी सकाळी शिवसेनेकडून अधिकृतपणे महापौर राजीनामा देणार, असे जाहीर करण्यात आले अन् पुन्हा नव्या जोमाने चर्चा सुरू झाली. येत्या ३० नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा बोलावून त्यात तुपे राठोड हे दोघे राजीनामा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रभारी नगर सचिव दत्तात्रय सूर्यवंशी हे सोमवारी रजेवर होते. त्यामुळे सर्वसाधारण सभा बोलावण्याची प्रक्रिया सोमवारी होऊ शकली नाही. स्थायी समितीच्या तीन सदस्यांनी मागणी केल्यास तीन दिवसांच्या अंतराने विशेष सभा बोलावली जाऊ शकते. सात दिवसांच्या अंतरावर महापौर आपल्या अधिकारात सभा बोलावू शकतात. ३० नोव्हेंबरला अजून दिवस आहेत. त्यामुळे महापौर आपल्याच अधिकारात सभा बोलावतील, अशी चर्चा आहे.
सोमवारी महानगरपालिका मुख्यालयाकडे पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे दिसून आले. महापौरपदावर नवा गडी कोण असणार यावर काहींमध्ये पैजा मात्र लागत होत्या. भाजपकडे ११ महिन्यांपेक्षाही कमी कालावधीसाठी महापौरपद जाणार आहे, परंतु भाजपच्या गोटात अजून चर्चेला सुरुवात झालेली नाही. राजीनाम्यानंतरच काय ते ठरवले जाईल, असे सांगण्यात आले. महानगरपालिकेची विशेष सभा बोलावण्यात आल्याची सूचना जारी झाल्यानंतर घडामोडी वेगवान होणार हे नक्की आहे. दोन दिवसांत विशेष सभेची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...