आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक सीमेवरील विद्यार्थ्यांना ‘सीईटी’साठी अर्जाची मुभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र- कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी- सीईटी २०१६ या प्रवेश परीक्षेचे अाॅनलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अाैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अार.एम. बाेर्डे व न्या. पी.अार. बाेरा यांनी मंगळवारी दिला. तसेच या परीक्षेसही बसू देण्याची परवानगी देताना ही मुभा याचिकेच्या अंतिम निकालाच्या अाधीन राहील.

या परीक्षेस आॅनलाइन अर्ज सादर करण्यास काही अडचण आली तर सीमाभागातील विद्यार्थी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्जाची प्रिंटेड काॅपीही जाहिरातीत दिलेल्या वेळेत पाठवू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले अाहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमावलीमध्ये आरक्षण जाहीर केले अाहे. त्यांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार अाहे.
महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमेवरील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून सीईटीचे प्रवेश अर्ज भरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या भागातील विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली हाेती, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. वरील विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा कर्नाटक राज्यातूनच द्यावी. त्यांचे गुण महाराष्ट्रातील व्यावसायिक परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातील, असे महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. मात्र, कर्नाटक राज्यात वरीलप्रमाणे प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती. त्यामुळे वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करणारी याचिका अाैरंगाबाद खंडपीठात दाखल केली हाेती.
याचिकाकर्ता कुलदीप शंकरराव राठोड या विद्यार्थ्याने अॅड. सचिन एस. देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. साेमवारी या याचिकेची प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात प्रतिवादी राज्य शासन आणि डायरेक्टर आॅफ एज्युकेशन अॅड. रिसर्च गव्हर्मेन्ट डेंटल कॉलेज अॅड. हॉस्पिटल, मुंबई यांच्या वतीने सहायक सरकारी वकील एस.के. कदम यांनी नोटीस स्वीकारली.
बातम्या आणखी आहेत...