आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री खोतकरांसंबंधीच्या याचिकेवर आज सुनावणी; विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची जालना विधानसभा मतदारसंघातील निवड रद्द करण्यात यावी, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेची सुनावणी न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुरू झाली असून खोतकर यांचे निवडणुकीतील निकटचे प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांचा साक्षपुरावा पूर्ण झाला आहे. राज्यमंत्री खोतकर उपरोक्त प्रकरणी आपली बाजू मांडणार आहेत. मंगळवारी दुपारी ४.३० वाजता यावर सुनावणी होणार आहे. 

जालना येथील शेख चाँद, माजी आमदार कैलास गोरंट्याल व्यापारी विजय चौधरी यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये खोतकर यांनी गोरंट्याल यांचा जालना विधानसभा मतदारसंघातून पराभव केला. गोरंट्याल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. नामनिर्देशन दाखल करण्याची निर्धारित वेळ संपल्यानंतर खोतकर यांनी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. 

निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला असा आक्षेप आहे. शेख यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीररीत्या फेटाळल्याचे याचिकेत म्हटले आहे. चौधरी यांनीही खोतकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. उपरोक्त प्रकरणाची सीडी आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळवल्याचे त्यांनी सोमवारी (६ मार्च) नोंदवलेल्या साक्षीत म्हटले आहे. तिन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी मंगळवारी सुरू राहील. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण शहा, अॅड. नितीन चौधरी आदी काम पाहत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...