आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: आ. अतुल सावेंच्या कार्यालयाची तोडफोड, दादागिरी मोडीत काढल्याने हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार सावे यांच्या बजरंग चौकातील कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भाजप कार्यकर्ते घटनास्थळी जमले होते. - Divya Marathi
आमदार सावे यांच्या बजरंग चौकातील कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भाजप कार्यकर्ते घटनास्थळी जमले होते.
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तोडफोड करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणाऱ्या आमदार अतुल सावे यांच्या बजरंग चौकातील संपर्क कार्यालयाची गुरुवारी (१६ फेब्रुवारी) तोडफोड करण्यात आली. पँथर्स सेनेचे प्रमुख सतीश पट्टेकर आणि प्रदेशाध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात दुपारी तीन वाजता हिंस्र आंदोलन केले. तत्पूर्वी सावेंच्या खडकेश्वर येथील मुख्य कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्ल्याची योजना आखली, मात्र पोलिसांनी तिथे फौजफाटा वाढवल्यामुळे बजरंग चौकातील कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली.
 
शासनाचे निर्देश नसताना विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केल्याच्या निषेधार्थ ११ फेब्रुवारीला बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी कार्यक्रम उधळून लावला होता. आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, सचिन शिंदे आदींसह इतर कार्यकर्त्यांची डॉ. अशोक मोडक व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात समजूत काढत असताना भाजपचे कार्यकर्ते डॉ. गजानन सानप यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विद्यापीठात बोलावून कार्यक्रम उधळून लावणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. सभागृहाची तोडफोडही
केली होती. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भाजप आमदार अतुल सावे यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता भेट घेतली. डॉ. मोडक यांचे व्याख्यान उधळणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई करा, अशी मागणी त्यांनी कुलगुरूंकडे केली होती. तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना मात्र पाठीशी घालण्याचा सावे यांनी प्रयत्न केल्यामुळे पँथर्स सेनेच्या कार्यकर्त्यांनीही गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. खडकेश्वर येथील अंजली सिनेमागृहाजवळच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करण्याचा पँथर्स सेनेचा इरादा होता, पण पोलिसांना कळाल्यामुळे अंजली सिनेमागृहाजवळ बंदोबस्त वाढवण्यात आला होता. दुपारी सव्वादोनच्या सुमारास क्रांती चौक आणि सिटी चौक पोलिस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. 

विद्यापीठात आज दोन आंदोलने : कार्यक्रम उधळणाऱ्यांवरच कारवाई करून विद्यापीठातील तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचा अतुल सावे यांनी प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधी असताना पक्षपाती भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ विद्यापीठात आज दोन वेगवेगळ्या संघटनांचे आंदोलन होणार आहे. डॉ. गजानन सानप, डॉ. सर्जेराव ठोंबरे, सचिन झव्हेरी यांच्यासह भाजपच्या हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एसएफआयच्या वतीने दुपारी एक वाजता तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड यांनी सांगितले. बहुजन क्रांती मोर्चाचे आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, सचिन शिंदे, प्रकाश नवतुरे, बलवान शिंदे, संदीप पट्टेकर आदी बेमुदत उपोषण करणार आहेत. 

सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल : सचिनतिवारी (३२, रा. नागेश्वरवाडी), राहुल घेवंदे (३१, रा. संजयनगर), किरण तुपे (२३, रा. पंचशीलनगर, बालाजीनगर), विशाल नवगिरे (२२, रा. रमानगर), दीपक केदार (३२, रा. चिकलठाणा) यांच्या विरोधात सिडको पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुलगुरूंना रोहित वेमुलाप्रमाणे बळी हवाय 
- कुलगुरू डॉ.चोपडे स्वत: संघ आणि भाजपच्या आहारी गेलेले आहेत. कुलगुरुपदानंतर त्यांना मोठ्या पदाची लालसा लागलेली असल्यानेच संघाच्या इशाऱ्यावर कुलगुरू काम करत आहेत. बाबासाहेबांच्या विद्यापीठात संघ विचारधारेची पेरणी करून कुलगुरूंना आम्ही कदापि मोठे होऊ देणार नाही. ज्याप्रमाणे हैदराबाद विद्यापीठाला संघाने ताब्यात घेऊन रोहित वेमुलाचा बळी दिला त्याप्रमाणे येथेही वेमुला करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पँथर्स सेनेचा एल्गार सुरूच राहणार आहे. -सतीश पट्टेकर, पँथर्स सेनेचे प्रमुख 
 
पुढील स्लाईडवर वाचा, विद्यापीठ फोडणाऱ्यांना सोडले, आमदारांचे कार्यालय फोडणाऱ्यांना पोलिसांनी पकडले ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...