आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासाठी फक्त पाणी पिऊन 42 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातेचे उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या ४२ दिवसांपासून मीनाताई उपोषण करत आहेत. - Divya Marathi
गेल्या ४२ दिवसांपासून मीनाताई उपोषण करत आहेत.
औरंगाबाद - वर्षभरापूर्वी पैठण रोडवर अपघातात ठार झालेल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करा आणि माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत एक माउली गेल्या ४२ दिवसांपासून केवळ पाणी पिऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहे. मीनाताई रघुनाथ म्हस्के असे या माउलीचे नाव. तिचा २७ वर्षांचा मुलगा सतीश म्हस्के २१ एप्रिल २०१६ रोजी पैठण रोडवर अपघातात मरण पावला. मात्र, अपघात करणारा अजूनही सापडला नाही. मला पैसे नकोत, केवळ मुलाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच या मातेची भावना आहे. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीनाताईंनी १५ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कडक उन्हातही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. उपोषण परत घ्यावे यासाठी पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन सातत्याने विनंती करत आहे. मात्र, शोकसंतप्त मातेने पोलिसांना माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत व्यक्तीचा शोध घ्या, नाही तर अंगावरची वर्दी काढून ठेवा, अशा शब्दांत ठाणकावत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार केला. 
 
दररोज एका पोलिसाकडून भेट : मीनाताईया सिडको एन-७, त्रिवेणीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. त्यांना तीन मुली असून दोघींचे लग्न झाले आहे. सिटी चौक ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी गेल्या ४२ दिवसांपासून रोज पोलिस हजेरी लावतात. मीनाताई यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. मीनाताई सकाळी योगा करत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याशिवाय त्या काहीही घेत नाहीत.
 
तपास सुरू : चिकलठाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. मीनाताई म्हणाल्या की, उपोषणाला बसण्यापूर्वी मी रोज दोन वेळा पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी सापडला का, याबाबत विचारत होते. तेव्हा पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. मला माझ्या मुलाला कोणी मारले, अपघात कसा झाला, गर्दीचा रोड असताना अपघात झाल्यावर तो कोणीच कसा पाहिला नाही, पोलिसांना आरोपी का सापडत नाही याचे उत्तर मिळत नाही. एका आरोपीला पकडता येत नसेल तर पोलिसांनी वर्दी काढून का ठेवू नये, असा संतप्त सवालही त्यांनी केला. 
 
कधी घडली होती घटना? 
२१ एप्रिल २०१६ रोजी सतीश म्हस्के दुचाकीने पैठण रोडकडे जात होता. कंपनीत जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो मरण पावला. चिकलठाणा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
प्रशासनाने समजावून सांगितले 
-  या प्रकरणात आम्ही महिलेची भेट घेऊन समजावून सांगितले आहे. पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचीदेखील त्यांच्या मुलींनी भेट घेतली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विश्वंभरगावंडे, निवासी
 
उपजिल्हाधिकारी न्यायासाठी वैराग्य 
सतीशचे निधन झाले त्या वेळी त्याचा मुलगा केवळ दोन महिन्यांचा होता. मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मी हे वैराग्य धरले आहे. ४२ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. केवळ पाणी प्राशन करते. नवीन जिल्हाधिकाऱ्यांनाही माझी मुलगी भेटली. मला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे.
-मीनाताई म्हस्के, उपोषणकर्त्या 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...