औरंगाबाद- नगरसेवक होऊन दोन वर्षे लोटली. परंतु या काळात खासदार चंद्रकांत खैरे यांचे सुपुत्र ऋषिकेश आणि आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत या दोघांनीही सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत मौनच धारण केल्याचे चित्र दिसले. आपणहून त्यांनी मुद्देही उपस्थित केले नव्हते. आता दोघेही स्थायी समितीचे सदस्य आहेत. बुधवारी या दोघांनीही आपापल्या वॉर्डातील मुद्दे उपस्थित करून मौन एकदाचे सोडले. सिद्धांत यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडल्यानंतर त्याच तोडीने ऋषिकेश यांनीही आपल्या वॉर्डातील समस्यांना हात घातला.
रेल्वेस्थानक येथील पालिकेच्या व्यापारी संकुलाजवळ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून ती तातडीने हटवावीत, रेल्वेस्थानकासमोरील पेट्रोल पंप हटवावा, हॉलिडे कॅम्प येथेही अतिक्रमणे होत असून ती तातडीने हटवण्यात यावीत, अशी मागणी सिद्धांत यांनी केली. त्यावर तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन अतिक्रमण विभागाचे प्रमुख एम. बी. काजी यांनी दिले. त्याला सिद्धांत यांनी आक्षेप घेतला. मी यापूर्वी अनेक पत्रे देऊनही कारवाई होत नाही. अधिकारी खोटे बोलतात, वेळ मारून नेतात, असा आरोप त्यांनी केला. त्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
समर्थनगर येथे ड्रेनेजलाइन का टाकण्यात येत नाही, असा मुद्दा ऋषिकेश खैरे यांनी उपस्थित केला. नागरिकांचा विरोध असल्यामुळे विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर येथील नागरिकांचा विरोध नाही, मी अनेक दिवसांपासून मागणी करतोय, तरीही प्रशासन लाइन का टाकत नाही, असा प्रश्न ऋषिकेश यांनी केला. दहा दिवसांत येथील काम सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांना मिळाले.
वडिलांच्या बोलकेपणाची करून दिली होती आठवण
नगरसेवकम्हणून आपण सभागृहात वार्डाच्या समस्या मांडल्या पाहिजेत, अशा शब्दात ज्यांनी समजावले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे दोघे सभागृहात बोलल्याचे सूत्रांनी सांगितलेे. आमदार शिरसाट नगरसेवक असताना सभा गाजवत होते. खैरे यांचा नगरसेवकपदाचा कार्यकाळही बोलका होता. त्याची आठवण करून देत त्यांच्या मुलांनी बोलले पाहिजे, असा आग्रह केला जात होता. खासदार आमदारपुत्र सभागृहात बोलतच नाहीत, अशी चर्चा शिवसेना वर्तुळात सुरू झाली होती. त्यामुळे काही नगरसेवकांनी या दोघांचा क्लास घेतल्याचे समजते.