आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: महावितरणचे नऊ कर्मचारी निलंबित, 40 जणांना नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीज बिलाच्या वसुलीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, ४० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई महावितरण कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे कोण कसे काम करत आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महावितरणने थकीत वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आणखी काही जणांविरुद्ध कारवाईची दाट शक्यता आहे. 
 
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचा नियमित भरणा होत नसल्यामुळे औरंगाबाद परिमंडळात २७० कोटींपेक्षा जास्त थकबाकी झाली आहे. या थकबाकीमुळे संचालन सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यातून बाहेर पडण्यासाठी वसुली आवश्यक आहे. वसुली करा, नाही तर वीज कनेक्शन कायमस्वरूपी खंडित करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

अन्याय कारककारवाई : पूर्वी१३०० पेक्षा अधिक तांत्रिक कामगार होते. आता त्यांची संख्या केवळ ६०० वर आली आहे. वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेवर थकबाकी वसूल केली नाही. कंपनीत शेवटचा घटक असलेल्या लाइनमनवर नाहक खापर फोडले जात आहे. वसुलीचा तगादा लावला जात आहे. वरिष्ठांच्या धाकामुळे छावणी शाखेतील लाइनमन शेख अन्सार आजारी पडले आहेत. उपचार सुरू असतानाच ते काहीच काम करत नाहीत, असा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अन्यायकारक कारवाई केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष उमेश बोराडे यांनी केला आहे. 

महावितरण परिमंडळासमोर शनिवारी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे तांत्रिक कामगारांच्या निलंबनाचा निषेध करण्यात आला. निलंबित कामगारांचे निलंबन रद्द केल्यास एक मार्चपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी दिला. या निर्णयाला इंटकचे अख्तर अली आणि कामगार महासंघाचे पिवळ यांनी पाठिंबा दिला. या वेळी श्रावण कोळूनकर, एस.आय. सय्यद, प्रभाकर लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. या सभेस केंद्रीय कोशाध्यक्ष ताराचंद कोल्हे, झोन सचिव अशोक कोल्हे, कैलास गौरकर, संजय शाहीर, तांत्रिक कामगारांची उपस्थिती होती. 

२७० कोटींपेक्षा जास्त थकबाकी झाली आहे. 
४० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...