आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नेत्यांचे लक्ष मिनी मंत्रालयाच्या निकालाकडे, भाजप, शिवसेना युती तुटल्याने प्रचंड चुरस वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 आैरंगाबाद  -जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नुकतेच १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले; परंतु आता मिनी मंत्रालयावर तसेच पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.   

 जवळपास महिनाभर प्रचाराची धुरा सांभाळून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी खेडोपाडी फिरून सभा, संमेलने घेत ग्रामीण भागात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी जिवाचे रान केले. 
 
यातच जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, महादेव जानकर,  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नारायण राणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री रामदास कदम  आदी नेत्यांनी हजेरी लावली.   
 
 यासोबतच नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना, काँग्रेस तसेच भाजप, राष्ट्रवादीला ठिकठिकाणी साधारण यश मिळाले. यातच काँग्रेसला कमी जागा मिळाल्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्षपद सोडले. 
 
या वेळी शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये स्थिरावलेले माजी आमदार नामदेव पवार  यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नेतृत्व केले, तर शिवसेनेकडून खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, मुन्ना त्रिवेदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, तसेच भाजप प्रवक्ते आमदार प्रशांत बंब यांनी धुरा सांभा‌ळली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह काँग्रेसने आैरंगाबाद महानगर पालिकेच्या नगरसेवकांना तालुक्याची विभागणी करून प्रत्येकी दोन नगरसेवकांनी ग्रामीण भागात फिरुन प्रचाराची धुरा सांभाळली. 
 
 या निवडणुकीच्या माध्यमातून आैरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचे श्रीराम महाजन (ता. सिल्लोड) अध्यक्ष होते. नुकत्याच पार पडलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे हे तिसऱ्यांदा (हॅट््ट्रिक) विजयी झाले आहेत. तसेच यादरम्यान नगरपालिकांच्या निवडणुकीतदेखील मतदारांकडून थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजपसह काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले; परंतु  राष्ट्रवादीसह शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
 
 या निवडणुकीचा परिणामदेखील ग्रामीण भागातील निवडणुकांवर होत असतो. याचा विचार करून सर्व पक्षांतील आैरंगाबाद महानगरपालिकेतील नगरसेवकांना तालुक्याचे वाटप करून त्या - त्या ठिकाणी प्रचारसभा तसेच मतदारांच्या भेटी घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार त्या गण, गटात त्या - त्या समाजाच्या मतदारांची लोकसंख्या जास्त आहे. त्यानुसार समाजातील नगरसेवकांनादेखील विशेष अशी जबाबदारी देण्यात आली होती.    
 
 जिल्ह्यात असे आहे सर्वपक्षीय विधानसभेतील बलाबल (विधान परिषदेसह)   
 शिवसेना ३ ,भाजप ३, काँग्रेस १, राष्ट्रवादी ३, एमआयएम १, खासदार १   
 आमच्या पक्षाला या वेळी मागच्या पेक्षा जास्त जागा मिळतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही सत्ता स्थापन करणार हे मात्र नक्की. केंद्रात तसेच राज्य सरकारच्या सत्तेमुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निकालामध्ये काहीही फरक पडणार नाही.    
 नामदेव पवार, शहराध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस    
   
   युती तुटल्याने आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या ताकदीने उतरलो होतो. परंतु पंचवार्षिकमध्ये भाजपशी आमची युती होती. आमच्या ज्येष्ठ नेत्यांनीदेखील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये खूप वेळ दिला. आता जिल्हा परिषदेवर आमचीच सत्ता येणार यात शंकाच नाही.    
 रंजना कुलकर्णी, जिल्हाप्रमुख, महिला आघाडी, शिवसेना 
बातम्या आणखी आहेत...