आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सात’चीबी तारीख गेली, ‘चौदा’चीबी गेली, आता पुढे काय? आयुक्तांनी स्वत:हून खडा टाकल्याची चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया - Divya Marathi
पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया
औरंगाबाद- ‘माझीबदली होतेय, किंवा १४ तारखेला आदेश येईल,’ अशा शब्दांत पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्वत:च आपल्या बदलीचे सूतोवाच केले होते. असे बोलणारे ते पहिलेच आयुक्त. परंतु त्यांनी स्वत:च सांगितलेल्या तारखा संपल्या. ‘सातचीबी तारीख गेली, चौदाचीबी तारीख गेली, आता पुढे काय,’ असा प्रश्न सर्वांनाच पडला. तोच प्रश्न ‘दिव्य मराठी’ला पडला आणि त्याच थेट शब्दांत विचारणा करण्यात आली असता, आता ‘सरकार देईल ती तारीख’ असे बकोरिया यांनी मनमोकळेपणे हसत सांगितले. 

पंधरा दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना बकोरिया यांनी आपली बदली होतेय, असे स्वत:च सांगितले होते. त्यामुळे अवघ्या एक वर्षाच्या कारकीर्दीनंतर बकोरिया जाताहेत, असे अनेकांना वाटले होते. त्यामुळे अनेकांनी एप्रिलला ‘आयुक्तांच्या बदलीचे काय झाले?’ अशी विचारणा केली. तेव्हा स्वत: आयुक्तच शहराबाहेर होते. त्यानंतर सर्वांना १५ एप्रिलची प्रतीक्षा होती. कारण १४ एप्रिल ही तारीख आयुक्तांनी सांगितली होती नेमकी त्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुटी होती. त्यामुळे शुक्रवारी नव्हे तर शनिवारी आदेश निघेल, असे अनेकांना वाटले होते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. तेव्हा थेट बकोरिया यांच्याशीच विचारणा केली असता ‘सरकार ठरवेल ती माझ्या बदलीची तारीख’ असे उत्तर त्यांनी दिले. 

माझ्या बदलीचे प्रयत्न चालू आहेत, एवढीच कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून खडा टाकून बघितला असावा, असा एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे काही अधिकारी नागरिकांना आवडतात. त्यामुळे बदली होतेय, असे कानी येताच राज्यात काही ठिकाणी आंदोलने झाली आहेत. ज्यांचा सल्ला बकोरिया घेतात असे बोलले जाते ते सुनील केंद्रेकर यांची बीड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्याच मार्गाने बहुधा बकोरिया यांना जावेसे वाटले असावे. त्यामुळे त्यांनी खडा टाकला. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांनीच त्यांची बदली होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली अन् पुढे हे प्रकरण थंडावले. 

शक्यता कायम आहे 
दरम्यान,बकोरिया यांनी स्वत:च स्वत:च्या बदलीची बातमी पसरवून नेमके पालिका वर्तुळात काय घडते, याचा अंदाज घेतला असावा, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बकोरिया यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलीसाठी राजी नव्हते. परंतु पक्षपातळीवर फडणवीस यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या नेत्याने थेट शब्दांत सांगितल्यानंतर फडणवीस राजी झाले. त्यामुळे बदली तर होणारच, परंतु ती नेमकी कधी होते एवढेच शिल्लक असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे बदलीची तारीख कधी, हाच प्रश्न असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थांनी म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...