आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टीचा डाटा; बकोरियांनी शोधला, मुगळीकरांना सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराने पाणीपट्टीधारकांची माहिती (डाटा) दिल्याने आम्ही वसुली करू शकत नसल्याचे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी वेळोवेळी सांगितले होते, हा डाटा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे म्हणतच ते बदलून गेले तरी डाटा काही मिळाला नाही. परंतु शनिवारी डी. एम. मुगळीकर यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला अन् कंपनीकडून सर्व डाटा मिळाला. तो आता वाॅर्ड अधिकाऱ्यांकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर पाणीपट्टीची वसुली सुरू होईल, असे मुगळीकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ऑक्टोबरमध्ये पालिकेने समांतरकडून पाणीपुरवठा ताब्यात घेतला होता. त्यानंतर पाणीपट्टीची वसुली पालिका करू शकली नाही. कारण कंपनीने डाटाच दिला नाही त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, अशा शब्दांत बकोरिया यांनी हतबलता व्यक्त केली होती. त्यामुळे न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय डाटा मिळतो की नाही, असा प्रश्न होता. परंतु हा डाटा पालिकेकडे उपलब्ध झाला असल्याचे मुगळीकर यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर तो संबंधित वाॅर्डांकडेही पाठवण्यात आला आहे. आता नोटिसा पाठवून लगेच वसुलीही सुरू होईल, असा दावा मुगळीकर यांनी नव्या दमात केला. कारण कंपनीनेच हा डाटा आता पालिकेकडे सुपूर्द केला आहे.
 
इतके दिवस कंपनीने टाळाटाळ का केली, आता डाटा का हवाली केला, याच्या कारणांच्या फंदात जाता मुगळीकर यांनी तातडीने वसुली करण्यास सांगितले आहे. हा डाटा वाॅर्ड अधिकाऱ्यांना सोपवण्यात आला आहे. त्यांच्याकडून नळधारकांना नोटिसा देण्यासाठी किमान पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी लागू शकेल. म्हणजेच मे महिन्याच्या शेवटपर्यंत नोटिसा घरपोच मिळालेल्या असतील आणि तेव्हापासून वसुली सुरू होऊ शकेल. कारण अनेकांनी गतवर्षीची पाणीपट्टी भरलेली नाही. परिणामी पाणीपट्टीतून यंदा पालिकेच्या तिजोरीत येणारा महसूल हा काहीसा जास्तीचा असेल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

तूर्तास ४०७० एवढी पाणीपट्टी 
गतवर्षीचीपाणीपट्टी ही ३७०० रुपये होती. त्यात नियमानुसार १० टक्के वाढ होणार आहे. कारण करवाढ करण्याचा सर्वसाधारण सभेने घेतलेला प्रस्ताव शासनाकडे अजून गेलेला नाही. जोपर्यंत शासनाकडून मान्यता येत नाही, तोपर्यंत वार्षिक ४०७० याच दराने प्रशासनाला पाणीपट्टी वसूल करावी लागेल. ज्यांच्याकडे दोन वर्षांची थकबाकी आहे, त्यांना ७७७० एवढी पाणीपट्टी यंदा भरावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...