आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन बारवालांसाठी ‘कुर्बानी कोण देणार? एकही सदस्य निवृत्त होत नसल्याने पेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पुढील वर्षासाठी स्थायी समितीचे सभापतिपद भाजपकडे असणार आहे. भाजपप्रणीत शहर विकास आघाडीचे अध्यक्ष गजानन बारवाल यांना हे पद देण्याचा शब्द भाजपने दिला आहे. मात्र बारवाल यांच्यासमोर मोठी अडचण आहे, ती स्थायी समितीत सदस्य म्हणून जाण्याची. कारण या आघाडीचे कैलास गायकवाड आणि कीर्ती शिंदे या दोघांचाही कार्यकाल अजून एक वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे दोघातील एकाने राजीनामा दिला तरच बारवाल स्थायी समितीत जाऊ शकतील. त्यामुळे आता बारवाल यांच्यासाठी स्थायी समितीच्या सदस्यत्वाची कुर्बानी कोण देतो याकडे लक्ष लागले आहे. 

गायकवाड किंवा शिंदे यांनी राजीनामा दिला तरच बारवाल सभापती होऊ शकतात. त्यामुळे शहर विकास आघाडी तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोघांची मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, बारवाल यांना भाजपच्या कोट्यातून थेट सभापती करण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे दोनपैकी एका सदस्याच्या राजीनाम्यावर अजून निर्णय होऊ शकलेला नाही. 

३० एप्रिलपूर्वी सदस्याने राजीनामा दिला तर स्थायी समितीत सदस्य पाठवताना त्याचा विचार होईल. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने बारवाल हे पदमपुरा वाॅर्डातून अपक्ष विजयी झाले. त्यांनी सेनेत परत यावे यासाठी तेव्हा प्रयत्न झाले होते, परंतु बारवाल यांनी १३ जणांचा स्वतंत्र गट स्थापन करून भाजपला मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी शहर विकास आघाडी नावाने गट स्थापन करून भाजपला मदत केली. त्या बदल्यात त्यांना एक वर्ष स्थायी समितीचे सभापतिपद देण्याचे ठरले होते. आता सभापतिपद भाजपकडे असल्याने आपले वचन पूर्ण करण्याची तयारी भाजपमधील एका गटाने चालवली आहे, तर दुसरा गट आक्षेप घेत आहे. अर्थात, बारवाल स्थायी समितीत सदस्य म्हणून गेले तरच पुढील हालचाली होऊ शकतील. त्यामुळे गायकवाड किंवा शिंदे यापैकी कोण राजीनामा देतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

...तर होऊ शकते अडचण 
यादोघांपैकी एकानेही राजीनामा दिला नाही तर अडचण होऊ शकते. दुसरीकडे भाजपचा एकच सदस्य (नितीन चित्ते) सभागृहातून निवृत्त होत आहे. विकास आघाडीच्या दोनपैकी एकाही सदस्याने राजीनामा दिला नाही तर भाजपच्या गोटातून बारवाल यांना स्थायी समितीत पाठवावे लागेल. त्यानंतरच ते सभापती होऊ शकतील. 
बातम्या आणखी आहेत...