आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी कंपनीचा प्रस्ताव येताच नारेगावातील खतनिर्मिती प्रकल्प गुंडाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नारेगाव येथील मनपाचा कचरा डेपो सन २०१८ पर्यंत हलवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत आणि ही मुदत संपायला कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या डेपोचे काय करायचे, या प्रश्नाने मनपा प्रशासनाला इतके त्रस्त केले आहे की एक योजना सुरू होत नाही तोपर्यंत दुसरी योजना आणण्याची घाई झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी खर्च केलेले ८५ हजार रुपयेही वाया जाणार आहेत.
 
घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपाने याआधी दोन ठेकेदारांना काम सोपवले होते. दोन्ही वेळी कचऱ्याचे व्यवस्थापन तर झालेच नाही, उलट कोट्यवधी रुपये वाया गेले. मे महिन्यात स्वच्छ भारत अभियानच्या तज्ज्ञ रागिणी जैन यांना या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी आमंत्रित केले. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सहा महिन्यांत त्याचे खतात रूपांतर करणार होत्या. त्यासाठी त्यांनी सोबत काही रसायनेही आणली होती. त्यासाठी त्यांना ८५ हजार रुपये दिले गेले. त्यांनी पुढच्या कामासाठी मनपाकडे पोकलेन, बुलडोझर यांची मागणी केली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्या वेळी घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले उपायुक्त विक्रम मांडुरके यांची बदली झाली. त्यानंतर तो विषयच मागे पडला आहे. दरम्यान, चीनहून आलेल्या बास्को कंपनीतर्फे घनकचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्पाचे प्रेझेंटेशन देण्यात आले. तेव्हापासून तो प्रकल्प राबवायचा विचार प्रशासन करते आहे. त्यामुळे नारेगावच्या कचरा डेपोचे खत करण्याचा प्रकल्प थंड बस्त्यात गेला आहे.

असा आहे नारेगाव कचरा डेपो
४९ एकर क्षेत्रावर १९८७ पासून हा कचरा डेपो आहे. यात सध्या ३० लाख टनांपेक्षा जास्त कचरा साचून राहिला आहे. त्यात नियमित ३०० टन कचरा येत असल्याने कचरा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे.

प्रस्ताव गुलदस्त्यातच
ज्या कचरा डेपोमध्ये ज्वलनशील पदार्थ, चिखल व कचरा वेगवेगळा नाही, तेथे कोणतीच ऊर्जा निर्माण करता येत नाही. मात्र, चीनकडून येथे आधी राखेपासून विटा तयार करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा चीनमध्ये येऊन विविध प्रकल्प पाहण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे अजूनही कंपनी काय करणार, याबाबत काहीच निश्चित नाही. त्यानंतर केंद्र, राज्य सरकारच्या परवानग्या, मनपाची परवानगी, कराराला लागणारा वेळ बघता यातच २०१८ निघून जाण्याची शक्यता आहे.

त्रयस्थ कंपनीकडून विचारणा करू
मांडुरकेंची बदली झाल्यानंतर रागिणी जैन यांचे काम पुढे गेले नाही. त्यात आता चिनी कंपनी इच्छुक आहे. त्यामुळे त्रयस्थ कंपनीकडून आणि तज्ज्ञांकडून माहिती घेऊन योग्य पावले उचलू.
- दीपक मुगळीकर, आयुक्त

प्रभाग कार्यालयातही प्रक्रिया होऊ शकते
खासगी कंपन्या समोर आल्या आहेत. त्यांना जागेची आवश्यकता अाहे.कचरा संकलनही या कंपन्याच करणार अाहेत, त्यांना प्रत्येक प्रभागात जागा दिल्यास तेथेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानुसार विचार करण्यात येत आहे.
- भगवान घडमोडे, महापौर
 
बातम्या आणखी आहेत...