आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंचे कडवट बोल..आई मेल्यावरही पोरं जगतात,हा तर पक्ष; पदाधिकार्‍यांनीच लावली वाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही कार्यकर्ता-पदाधिकारी संघटना वाढीसाठी गंभीर नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीच जिल्ह्यात पक्षाची वाट लावली आहे. सर्वांना फक्त पदे हवी आहेत. त्यांना पक्षाशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे मला पक्ष लहान असला तरी चालेल, पण असे कार्यकर्ते नकोत. आम्ही बाहेरून येऊन पक्ष चालवू. ज्याला सोडून जायचे आहे त्याने खुशाल जावे. आई मेल्यावरही पोरं जगतात. हा तर पक्ष आहे. आम्ही तो चालवू, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना झापले. 

पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असलेल्या सुळेंच्या उपस्थितीत गुरुवारी (२५ मे) हडको येथील राष्ट्रवादी भवनात मेळावा झाला. त्यात सुळेंनी अत्यंत तिखट शब्दांत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला. ‘होय, मी आरोप करतेय, तुम्हीच पक्षाची वाट लावली,’ असे त्या म्हणाल्या. 

वशिलेबाजीची तक्रार : या मेळाव्यात आधी विविध आघाड्यांचे अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यात ऐनवेळी आलेल्यांना पक्षात महत्त्व दिले जाते, जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाते, पदे दिली जात नाहीत, वशिलेबाजी चालते, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. हे सुरू असतानाच काही जण सभागृहाबाहेर निघून जात होते. आधीच उपस्थिती कमी, त्यात हा प्रकार पाहून सुप्रिया संतप्त होत म्हणाल्या, ‘हा पक्ष लहान झाला तरी चालेल, परंतु शिस्त पाळणारेच कार्यकर्ते मला पक्षात हवे आहेत. आमच्याकडे सात-सात तास बैठका चालतात, परंतु कोणी जागेवरून हालतही नाही. तुम्ही मात्र दहा मिनिटांनंतर बाहेर निघू लागले आहेत. ज्यांना पक्षाचे काम करायचे आहे त्यांनीच थांबावे, बाकीच्यांना ‘गुड बाय, गुड लक’ अशा शब्दांत सुनावले. सर्वच निघून गेले तरी चालतील, आम्ही बाहेरून येऊन पक्ष चालवू. आई मेल्यानंतरही मुले जगतातच. हा तर पक्ष आहे, आम्ही तो जगवूच, असेही त्यांनी ठणकावले. 
 
वजन कमी होणे चांगलेच : अनेक जणांनी मधल्या काळात पक्ष सोडल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्यावर सुप्रिया म्हणाल्या, बरे झाले अनेक जण निघून गेले, अशांची आम्हाला गरजही नव्हती. राहिला विषय जे शरद पवार यांना सोडून गेले त्यांचे पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहे. बरे झाले पक्षाचे अतिरिक्त वजन कमी झाले. वजन कमी होणे आरोग्यासाठी चांगले असते, असे त्या उपहासाने म्हणाल्या. 

यांची होती उपस्थिती : मंचावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार सतीश चव्हाण, आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार उषा दराडे, संजय वाघचौरे, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, महिला आघाडी शहराध्यक्ष मेराज पटेल, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय, माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील सुधाकर सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे हरिश्चंद्र लघाने पाटील, माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद असे मातब्बर नेते उपस्थित होते. 
 
फक्त २७ का? 
काही वर्षांपूर्वी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या १२ होती. आता ती एक तृतियांश (चार) राहिली आहे. विशेष म्हणजे त्या चारही महिला आहेत. पक्षाच्या प्रमुख महिला नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळव्याला मात्र अंकिता विधाते या एकमेव नगरसेविका उपस्थित होत्या. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या पत्नी पक्षाच्या नगरसेविका असूनही उपस्थित नव्हत्या. ‘फक्त २७’ का? या प्रश्नाचे आणखी वेगळे उत्तर काय हवे? 
 
युती सरकारला माणुसकी नाही 
दरम्यान,कोणत्याही पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने युती सरकारला माणुसकी नसल्याचा आरोप सुप्रिया यांनी पत्रकार परिषदेत केला. समृद्धी महामार्गाविषयी राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या बाजूने का नाही, या प्रश्नावर थेट बोलणे टाळत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवरच जबाबदारी ढकलून दिली. आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार संजय वाघचौरे यांनाही उत्तरे देता आली नाहीत. चिकटगावकर यांनी तर मोजणी झाली नसल्याचे सांगितले. समृद्धी महामार्गाविरोधात मराठवाड्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शांत का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, याबाबत अजूनही ब्ल्यू प्रिंट आली नाही. सक्तीने भूसंपादन करू दिले जाणार नाही. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा तयार करण्यात आला अाहे. दउत्तर प्रदेशात शेतकरी कर्जमाफी शक्य आहे तर महाराष्ट्रात का नाही. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, ‘राष्ट्रवादी भवनाला टाळे लावा’ आणि एका महिन्यात गतवैभव येऊ शकते...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...