औरंगाबाद - एड्सबाधित रुग्णांना क्षयरोग (टीबी) होण्याची शक्यता सामान्यांच्या तुलनेत ६० टक्के अधिक आहे. या रुग्णांना आजारासह आयुष्य जगणे सुखकर व्हावे म्हणून ९९ डॉट्सच्या माध्यमातून एकाच ठिकाणी दोन्ही आजारांची औषधी उपलब्ध करून देण्यात आली.
त्याबरोबरच मिस्ड कॉल तसेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांवर नजर ठेवण्याचे कामही सुरू झाले आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या केंद्रात १७ रुग्ण हे उपचार घेत आहेत.
या यंत्रणेनुसार एड्सग्रस्त रुग्णाला टीबी झाल्यास त्याची संपूर्ण माहिती ९९ डॉट्स सॉफ्टवेअरवर अपलोड केली जाते. यात रुग्णाने दिलेले एक किंवा दोन मोबाइल क्रमांकही असतात. रुग्णाने गोळी घेतल्यानंतर रॅपरवरील टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करायचा आहे. मिस्ड कॉल आल्यास रुग्णाने गोळी घेतली नाही, असा संकेत यंत्रणेला जातो. त्यानंतर टीबीसाठी काम करणारे समुपदेशक रुग्णाला फोन करून किंवा घरी जाऊन संवाद साधतात आणि उपचार सुरळीत होतील याची काळजी घेतात.
नवी यंत्रणा कशासाठी?
स्वाइनफ्लू किंवा डेंग्यूपेक्षाही अधिक घातक असलेल्या एमडीआर किंवा एक्सडीआर टीबीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा रुग्णांच्या थुंकीद्वारे इतरांना या पातळीचा टीबी होऊ शकतो. या प्रकारच्या टीबीवर कुठलीही औषधी परिणामकारक सिद्ध होत नाही. एड्सबाधितांना टीबी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी योग्य वेळी औषधी घेतल्यास टीबी बरा होऊ शकतो. पूर्वी रुग्णांना टीबीसाठी ते गोळ्या घ्याव्या लागत होत्या. यामुळे मळमळ, उलटी, जळजळ व्हायची. ९९ डॉट्स या नव्या प्रकारात गोळ्यांची संख्या कमी होऊन ते वर आणली आहे. या रुग्णांची काळजी घेतल्यास हा आजार समाजात पसरण्याचा धोका टळणार आहे.
एड्सचे रुग्ण किती ?
एड्सची लागण झालेले रुग्ण १३ हजारांवर आहेत. मात्र, सीडी ४(रक्तातील घटक) ची पातळी ५०० हून कमी असलेल्यांना एड्सची औषधी द्यावी लागतात. घाटीच्या केंद्रात ३००० रुग्ण सातत्याने उपचार घेतात. येथे समुपदेशन, मार्गदर्शन, उपचार यातून रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार दिले जातात.
रुग्णांची धावपळ कमी
- एड्सबाधितांना टीबीचा धोका सर्वाधिक आहे. अशा रुग्णांना एड्ससोबतच टीबीची औषधी घ्यावी लागत होती. दोन्ही ठिकाणी जाऊन औषधोपचार घेणे रुग्णांसाठी धावपळीचे होते. टीबीची औषधी घेतल्यास एमडीआर टीबी होऊ शकतो. याचा विचार करून नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याचा फायदा दिसू लागला आहे. -डॉ. मंगला बोरकर, घाटी