आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिसीचे पर्यटक दुप्पट,पण नोटाबंदीमुळे खरेदीला लगाम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पर्यटनाचा शाही आनंद देणाऱ्या डेक्कन ओडिसी रेल्वेतून दोन भारतीय २८ परदेशींसह ३० पर्यटक गुरुवारी औरंगाबादेत दाखल झाले. गत दोन महिन्यांच्या तुलनेत ओडिसीतील पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली असली तरी पर्यटकांना नोटाबंदीचा फटका बसतोय. त्यांचे हॉटेल, पर्यटनस्थळांची तिकिटे आदी आधीच बुक झाली असली तरी लहानसहान खरेदीसाठी अडचण सहन करावी लागतेय. मात्र, स्थानिक विक्रेत्यांचा फायदा होत असेल तर हा त्रास फार मोठा नसल्याचे मत तुर्कस्तानच्या पर्यटकांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जून २००४ पासून सुरू केलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेचे कामकाज आता खासगी पर्यटन कंपनी कॉक्स अँड किंग्जतर्फे पाहिले जाते. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील सहा मार्गांवर ही रेल्वे धावते. ओडिसीच्या वेगवेगळ्या पॅकेजेसपैकी गुरुवारी शहरात दाखल झालेली ओडिसी ज्युएल्स ऑफ डेक्कन पॅकेजअंतर्गत आली होती. १२ ऑक्टोबर रोजी आलेल्या ओडिसीत अॉस्ट्रेलियन पर्यटकांसह १५ जणच आले होते. यंदा ही संख्या दुपटीने वाढली आहे. यात तुर्कस्तानचे २४, इंग्लंडमधील ४, तर भारतीय पर्यटक आहेत. दिवस आणि रात्रीच्या प्रवासासाठी या पर्यटकांनी ३,६८,३५५ रुपये मोजले आहेत. मुंबई-विजापूर-एेहोल-पट्टडकल-हंपी-हैदराबाद-औरंगाबाद-वेरूळ-अजिंठा-मुंबई असा हा प्रवास आहे. गुरुवारी गाडी अाैरंगाबादेत दाखल झाली. येथून पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले. संध्याकाळी साडेसातला ते परतले. रात्री दहा वाजता रेल्वेने औरंगाबाद स्टेशन सोडून अजिंंठ्याकडे प्रवास सुरू केला. शुक्रवारी सकाळी ती पाचोरा रेल्वेस्टेशनला थांबा घेईल. येथून पर्यटक दिवसभर अजिंठा लेणी बघतील. संध्याकाळी साडेसहा वाजता रेल्वे मुंबईला रवाना होईल.

भारतीय संस्कृती श्रेष्ठ : औरंगाबादरेल्वेस्थानकावर खंडेराय जाधव यांच्या कलावंतांनी गणपती स्तवन सादर करून पर्यटकांचे स्वागत केले. मराठमोळा वेश परिधान केलेल्या कलावंतांचे सादरीकरण पाहून पर्यटक भारावले. सर्व पर्यटकांना टिळा लावण्यात आला. गुलाल उधळण्यात आला. हिंदुस्थानी संस्कृती समृद्ध आहे. आज त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले, असे तुर्कस्तानचे पर्यटक डॉ. उमोट अकायलोस यांनी सांगितले. ते म्हणाले, जगभरात भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व पटत आहे. आम्हीही रुग्णांना योगासने करण्याचा सल्ला देतो. दरम्यान, पर्यटकांना नोटाबंदीचा फटका बसलाय. पर्यटनस्थळांवर खरेदी करताना त्यांना सुट्या पैशाची अडचण येत आहे. इच्छा असतानाही मोठी खरेदी करता येत नसल्याचे अकायलोस म्हणाले. मात्र, भारत सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असेल तर आम्हाला होणारा त्रास फार मोठा नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.


विक्रेत्यांना त्रास
^डेक्कनअोडिसीतूनयेणाऱ्या पर्यटकांसाठी गाइड, लोकल ट्रान्सपोर्ट, प्रवेश तिकिटे अशी सर्व व्यवस्था आम्ही करतो. या सुविधांसाठी चलनबंदीचा फटका बसलेला नाही. मात्र, थ्री स्टारखालील हॉटेलमधील पर्यटकांसह व्यावसायिकांना त्रास होतोय. हातमाग, स्थानिक कलाकार, हॉकर्सच्या मालाला उठाव नाही, पर्यटक तक्रार करता हा त्रास सहन करत आहेत. -जसवंतसिंग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड,

सहकार्य मिळाले
^प्रवासाला निघतानाच नोटाबंदी बाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे अाम्ही तयारीने निघालो. बुकिंग ऑपरेटरकडून झाले, त्यात अडचण नाही आली. पण पर्यटनस्थळांवर खरेदी करताना हात अखडता घ्यावा लागला. प्रत्येक ठिकाणी लोकांचे सहकार्य मिळाले तरी खरेदीला मुरड घालावी लागली. -डॉ.उमोट अकायलोस, पर्यटक, तुर्कस्तान

बातम्या आणखी आहेत...