आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाळ जनावरांसाठी शंभर टक्के अर्थसाह्य, दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न, बँक अधिकाऱ्यांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयात अायोजित बैठकीत बोलताना मंत्री अर्जुन खोतकर तसेच उपस्थित अधिकारी वर्ग. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयात अायोजित बैठकीत बोलताना मंत्री अर्जुन खोतकर तसेच उपस्थित अधिकारी वर्ग.
जालना - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येत आहे. यात लाभार्थी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर गायी म्हशी दिल्या जाणार आहेत. यात योजना कार्यान्वित केल्यानंतर त्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बँकांनी शंभर टक्के अर्थसाह्य करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. 
 
यासंदर्भात सोमवारी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बँक आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गेली चार वर्ष सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यासांठी या विभागाचे राज्यमंत्री खोतकर यांच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येत आहे.
 
राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प असुन यात लाभार्थी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर प्रत्येकी दोन गायी किंवा दोन म्हशी दिल्या जाणार आहेत. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच पशुपालक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रारंभीच जवळपास लाख ३० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर यातील ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र दुष्काळामुळे अार्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी ही रक्कम उभी करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे खोतकर यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली. यात बँकांनी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करताना शेतकऱ्यांची अडवणूक करु नये अशा सूचना त्यांनी केल्या. 
शिवाय जे शेतकरी प्राथमिक स्वरुपात काहीच रक्कम भरू शकणार नाहीत त्यांचे प्रस्ताव रोखण्यात येऊ नये, असे खोतकर यांनी सांगितले.
 
याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले,झेडपी सीईओ दीपक चौधरी, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एस.एस.राऊतमारे आदींची उपस्थिती होती.
 
शंभर टक्के विमा 
लाभार्थींना शासनाकडून ५० टक्के अनुदानावर हे पशुधन दिले जाणार आहे. शिवाय या गायी म्हशींचा शंभर टक्के विमा काढण्यात आला आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के अर्थसाह्य केले तरी बँकांचे नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. तरी शेतकऱ्यांनी शक्य झाल्यास काही रक्कम भरावे जेणेकरुन बॅँकेचे अर्थसाह्य मिळणे सुलभ होईल, असे खोतकर यांनी सांगितले. 

तातडीने काम सुरू करा 
यायोजनेच्या अंमलबजावणीसाठी तातडीने काम सुरू करावे. लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्याचा फटका या योजनेतील लाभार्थी निवडताना होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शिवाय पारदर्शी पद्धतीने निवड करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...