आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीवर होताहेत १६ पीएचडी!, संशोधक करणार अनेक जादूई अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा ते बिडकीन या अडीच हजार हेक्टरवर भारत सरकार जपानच्या मदतीने डीएमआयसी ची स्मार्ट सिटी होत आहे. जपानच्या मदतीने होणाऱ्या या टोकियोला जुने शहर जोडताना मोठी कसरत होणार आहे. यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून स्मार्ट सिटीवर दोन वर्षांपासून तब्बल १६ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. तेही इस्रोच्या साहाय्याने. अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हे संशोधन होणार असल्याने स्मार्ट विद्यार्थी संशोधकांचे मोठे योगदान स्मार्ट सिटीला लाभणार आहे.

स्मार्ट सिटीवर हॉटेल रामा येथे मोठे चर्चासत्र झाले या ठिकाणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे. बीसीयूडी संचालक डॉ.के. व्ही. काळे, संगणकशास्त्र विभागाचे संचालक डॉ. रत्नदीप देशमुख संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी चर्चासत्रात अत्यंत उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला. स्मार्ट सिटीत राहायचे आहे ना, मग स्मार्ट व्हावे लागेल या तज्ज्ञांच्या प्रश्नाला विद्यापीठातील संशोधकांनी चोख प्रत्युत्तर आपले प्रत्यक्ष काम दाखवून दिले. स्मार्ट सिटी कशी असावी, ती कशी वसवावी तीचा डिजिटल आराखडाच विद्यार्थी तयार करीत आहेत. हा दीड कोटी रुपयांचा प्रकल्प असून तब्बल १६ संगणकशास्त्रात संशोधन करीत असलेले विद्यार्थी या प्रोजेक्टवर काम करीत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
इस्राो आणि रामानुजन चेअरची कमाल
भारतीय अवकाश तंत्रज्ञान विज्ञान संस्था( इस्रो) च्या वतीने विद्यापीठाला रामानुजन चेअर मिळाली आहे. ही चेअर अत्यंत मानाची असून त्यात आंतराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करण्याची परवानगी मिळते. त्याचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. सी. मेहरोत्रा आहेत. या चेअरच्या अंतर्गत विद्यापीठाचे १६ संगणकशास्त्रज्ञ विद्यार्थी स्मार्ट सिटीवर संशोधन करीत आहेत. यात ते शहराचा अभ्यास जिओ स्पेक्टॅकल तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास सुरू आहे.
भौगोलिक परिस्थितीचा त्रिमितीय अभ्यास
विद्यार्थी दोन वर्षांपासून इस्रोच्या तज्ज्ञांसह कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे डॉ.के.व्ही.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करीत आहेत. यात सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा त्रिमितीय अभ्यास सुरू आहे. शहरातील उंचसखल भाग, जमिनीखालील डाईक, पाणी, त्याची उपलब्धता याच अभ्यास रिमोट सेन्सिंगद्वारे सुरू आहे. १६ विद्यार्थ्यांना विविध विषय दिले आहेत यात जिओ स्पेक्टॅकल अभ्यास(त्रिमितीय) या पावसाचादेखील अभ्यास सुरू आहे. ढगांची स्थिती, रासायनिक बदलासह पावसाची शक्यताही वर्तवता येणार आहे.

आगळी वेगळी प्रथा
ही कार्यशाळा विकासावर आधारीत असल्याने उदघाटन, सत्कार वगैरे या औपचारिक गोष्टींना फाटा देऊन थेट कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हेच या चर्चासत्राचे वैशिष्ट्य ठरले.

मनपा पैसा कसा उभा करणार
बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ऋषीकुमार बागला म्हणाले की शहरात दोन स्मार्ट सिटी होत आहेत. एक डीएमआयसीची तर दुसरी केंद्र सरकारच्या शंभर स्मार्ट सिटी पैकीची दुसरी योजना. पहिली योजना सुरू झाली. पण दुसऱ्या योजनेचे पैसे मनपा कसे उभारणार हा प्रश्न आहे. केंद्र शंभर कोटी देईल. प्रत्येक शहराला आणखी शंभर कोटी राज्यशासन मनपालाही ही रक्कम द्यावी लागेल.

चिंतनाला विद्यार्थ्यांचे उत्तर
या कार्यशाळेत संशोधकांनी शहरवासीयांना स्मार्ट होण्याचा मूलमंत्र दिला तो करण्याची तयारी विद्यापीठात सुरू आहे, याचा गौप्यस्फोट प्रथमच कुलगुरूंनी या चर्चासत्रात केला. दिव्य मराठीने याची सखोल माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे संशोधन समोर आणले. पाऊस कधी पडेल, आज नळाला पाणी येणार की नाही. बसेसचे रूट, रेल्वेची स्थिती यासह असंख्य गोष्टी मोबाइल अॅपद्वारे आपल्याला कळणार आहे. स्मार्ट सिटीला लागणारे स्मार्ट संशोधन आमच्या विद्यापीठात सुरू असल्याचे कुलगुरूंनी ठामपणे तज्ज्ञांना सांगताच ते सारे अवाक झाले. या वेळी संशोधक विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अॅपपेक्षा प्रगत तंत्रज्ञान
>मोबाइलवर जे जिआयएस अॅप आहे, त्यापेक्षा पुढचे भाकीत दर्शवणारे अॅप विद्यार्थी या प्रोजेक्टमध्ये करतील, असा विश्वास आहे. याला किती वेळ लागेल ते आत्ताच सांगता येत नाही. साधारणपणे दोन ते पाच वर्षांचा कालवाधी अपेक्षित आहे.
डॉ.के.व्ही.काळे,संशोधनप्रमुख मार्गदर्शक

आयआयटीनंतर विद्यापीठच
>अशाप्रकारचा अभ्यास करणारे देशातील पहिले विद्यापीठ आहे. असा अभ्यास आय.आय.टी मुंबई,रायपूरनंतर फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुरू आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरू होण्याआधीच आमचे संशोधन सुरू झाले आहे.
डॅा.बी.ए.चोपडे कुलगरू

सुचवलेले उपाय
>पाण्याचेमीटरिंग तत्काळ करा, जेणेकरून स्मार्ट सिटीत पाणी वाया जाणार नाही
>वीज बचत, रेनवाॅटर हार्वेस्टिंग, कचरामुक्त कॉलनीसाठी ग्रीन हाऊसची योजना राबवा.
>स्मार्ट शहरांना खेडी जोडताना खूप सामाजिक बदलांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसह शहरी भागातील लोकांसाठी चर्चासत्रे घेऊन प्रबोधन करावे.
>शिक्षणावर अधिक भर देऊन सर्वांना समान पद्धतीचे शिक्षण देण्याची योजना स्मार्ट सिटीत असावी.
>शेतकऱ्याला स्मार्ट सिटीचा अविभाज्य भाग समजून त्यांनाही यात सामावून घेतले तर ती खरी भारतीय स्मार्ट सिटी होईल.
>नोकरी,रोजगार किंवा उद्याेग यांची मोठी उपलब्धता तयार करण्यावर भर द्यावा लागेल.
>मनपाने आपले उत्पन्न वाढवताना लोकसहभाग घ्यावा. उद्याेगांच्या ७०० कोटी सीएसआर फंडचा शहर विकासात फायदा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावेत.
बातम्या आणखी आहेत...