आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण संगीतप्रेमींच्या ऑर्केस्ट्राला ५३ वर्षे पूर्ण, २९ ऑगस्टला पुन्हा कला बहरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
५० वर्षांपूर्वी स्थापन ऑर्केस्ट्रातील सदस्य गीत सादर करतानाचे छायाचित्र. - Divya Marathi
५० वर्षांपूर्वी स्थापन ऑर्केस्ट्रातील सदस्य गीत सादर करतानाचे छायाचित्र.
औरंगाबाद- ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ या मोहंमद रफी यांनी गायलेल्या गीताप्रमाणे १९६२ मध्ये काही तरुणांना ऑर्केस्ट्राचे वेड लागले आणि ‘फ्रेंड्स ऑर्केस्ट्रा’ नावाने एक टीम तयार झाली. छंदामुळेच एकत्र आलेल्या फ्रेंड्स ऑर्केस्ट्राला आता ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळचे हे तरुण कलावंत आता ज्येष्ठ नागरिक आहेत. या ‘फ्रेंड्स’ची कला २९ ऑगस्टला पुन्हा ‘बहरणार’ आहे.

पोस्टमास्तर म्हणून निवृत्त झालेले नागेश दगडुजी माटे आणि त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत देव यांनी १९६२ मध्ये मराठवाड्यातील पहिला ऑर्केस्ट्रा स्थापन केला. आता दोघांचेही वय जवळपास ७८ वर्षे. त्यांनी तारुण्यात संगीताची आवड जोपासली आणि बारा जणांनी एकत्र येऊन ‘फ्रेंड्स ऑर्केस्ट्रा’ची स्थापना केली. त्या वेळी गणेशोत्सवात अत्यंत कमी मोबदल्यात गाणे सादर करून कला जोपासली गेली. भागवत श्रोत्यांची करमणूक करत असे. माटेंना १९४३ पासून बासरीवादनाचा छंद होता. हा छंद जोपासण्यासाठी वडिलांनी म्हैस विक्री करून त्यांना विदेशी बनावटीचे ‘क्लॅरोनेट’ वाद्य खरेदी करून दिले. त्यानंतर त्यांनी (१९५८) पुण्याच्या इक्बाल दरबार यांच्या स्टुडिओत ‘सॅक्सोफोन’ या वाद्याचे प्रशिक्षण घेतले. गेवराई येथील माटे यांना पोस्ट ऑफिसात नोकरी लागल्यानंतरही त्यांनी संगीताची साथ कधीही सोडली नाही. १९७२ मध्ये त्यांना कोलकाता येथे संगीतातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. १९६२ ते २०१० पर्यंत फ्रेंड्स ऑर्केस्ट्राने मराठवाड्यातील संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. हे कलावंत २०१० नंतर पुन्हा स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ये मेरे वतन के लोगों’ या संगीत रजनीनिमित्त एकत्र आले आहेत.


तरुण तुर्क..
लक्ष्मीकांतदेव (७८), नागेश माटे (७८), दिवंगत भरत दुगम, सुधाकर मोहाळ (६०), भरत भालकीकर (६८), प्रताप कोचुरे (७२), पुष्पा कोचुरे (६०), शकुंतला वाघुले (६०), चित्रलेखा देशपांडे (६०) आदींनी १९६२ मध्ये ऑर्केस्ट्राची स्थापना केली होती. त्या वेळी ऑर्केस्ट्रासाठी त्यांना फक्त एकच माइक मिळत होता.

ग्रुपला१२ रुपये मानधन
सर्वांनावाद्यांचा छंद होता यामुळेच ते एकत्र आले. त्यानंतर उस्मानपुऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांनी पहिला ऑर्केस्ट्रा सादर केला. त्यानंतर जुना बाजार पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर झालेल्या ऑर्केस्ट्रासाठी त्यांना १२ रुपयांचे मानधन मिळाल्याचा किस्सा माटे यांनी सांगितला.

२९ ऑगस्टला संगीत मेजवानी
२९ऑगस्ट रोजी फ्रेंड्स ऑर्केस्ट्राला ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन सांगीत मैफल रंगवण्याचे सुनिश्चित केले आहे. संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी सात वाजता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या उपस्थितीत फ्रेंड्स ऑर्केस्ट्राचा प्रयोग होईल. त्याशिवाय माटे यांचे प्रेरणास्रोत संगीतकार इस्माईल दरबार यांचे बंधू संगीतकार इक्बाल दरबार यांनाही निमंत्रित केले आहे.