आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यायी रस्त्याशिवाय पावसाळ्यात पैठण रोडचे चौपदरीकरण, रोजच वाहतूक कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साइड पट्ट्यांचे काम केल्याने त्यावर असे खड्डे पडलेत. चिखलही होतो. शिवाय वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात. - Divya Marathi
साइड पट्ट्यांचे काम केल्याने त्यावर असे खड्डे पडलेत. चिखलही होतो. शिवाय वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात.
औरंगाबाद: पैठण रोडवर महानुभाव आश्रम ते वाळूज लिंक रोड अशा दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. ऐन पावसाळ्यात या कामाला सुरुवात झाल्याने आणि पर्यायी रस्ता तयार केल्याने या भागात रोज संध्याकाळी वाहनचालक एक-एक तास अडकून पडत आहेत.
 
नक्षत्रवाडी, कांचनवाडी या मनपा हद्दीतील वॉर्डांसह पैठणहून औरंगाबादकडे येणाऱ्या आणि औरंगाबादहून तिकडे जाणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे हे काम वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. 
 
महानुभाव आश्रम ते वाळूज लिंक रोडपर्यंत वाहनांची वर्दळ अधिक आहे. लिंक रोड झाल्यापासून नगर, नाशिककडून औरंगाबादसह बीड जालन्याकडे जाणारी वाहने याच मार्गाने येतात. याशिवाय नक्षत्रवाडी, कांचनवाडी या स्थानिक भागातून शहरात येणाऱ्यांसाठीही हाच मार्ग आहे.
 
बीड बायपास परिसरातून वाळूजला जाणारेही याच मार्गाचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून हा रस्ता सातत्याने उखडत असल्याने आणि वाहनांची संख्या वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर्षी या रस्त्याचे चौपदरीकरणासह सिमेंटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
 
२७ मार्च २०१७ रोजी जीएनआय कन्स्ट्रक्शन या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. एप्रिल महिन्यात काम सुरू झाले. अडीच महिन्यांपासून या रस्त्याची एक बाजू खोदून त्यात पक्का मुरूम, खडी भरण्याचे काम सुरू आहे. कार्यारंभ आदेश दिल्यापासून नऊ महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला देण्यात आली आहे. 

गडबड : खदानीतून घालतात वाहने 
घाईने निघालेला एखादा दुचाकीस्वार गर्दीत अडकला तर तो सरळ नवीन रस्त्यासाठी खोदलेल्या खदानीतून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. एखादे वेळी वाहन खदानीमध्ये उतरवताना आणि पुढे वर काढताना छोटे-मोठे अपघातही होतात. शिवाय खदानीमध्ये सुरू असलेल्या भरावाचीही रोलिंग बिघडते. 
 
विचार न करता सुरू केले काम 
पूर्वीचा हा रस्ता दोन पदरी डांबरीकरण केलेला होता. यातील एक पदर खोदून त्यात भराव टाकणे सुरू आहे, तर वाहतुकीसाठी उर्वरित एक पदरी रस्त्याचा वापर सुरू आहे. दोन पदरी रस्ता वाहतुकीस अपुरा पडत असल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण होत आहे. मात्र, हे चौपदरीकरणाचे काम करत असताना पर्यायी रस्ता मात्र केला नाही. अत्यंत वर्दळीच या मार्गावर केवळ एकपदरी रस्त्यावरून वाहतूक कशी होऊ शकते, याचा जराही विचार ठेकेदार कंपनीने केला नाही. 
 
पर्यायी रस्ता नाही 
या मार्गावरील वाहतुकीचा भार पाहता चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वीच या रस्त्याला समांतर असा पर्यायी रस्ता करणे गरजेचे होते. जोडिलाच छोट्या वाहनांसाठी किमान पहिल्या रस्त्याच्या साइडपट्टीवर मुरूम टाकून रोलिंग करून वाहतुकीचा भार कमी करता आला असता.
 
मोठ्या जड वाहनांसाठी एखादा पर्यायी रस्ता आणि छोट्या वाहनांसाठी रस्त्याच्या बाजूच्या शोल्डरमध्ये मुरूम टाकलेला रस्ता, अशी व्यवस्था करूनच हे काम हाती घ्यायला हवे होते. त्यामुळे वाहतुकीचा कायम खोळंबा झाला नसता. 
 
पाऊस पडताच होतो गोंधळ 
सध्याया रस्त्याची साइडपट्टी पूर्वीची मातीचीच आहे. त्यामुळे दिवसभरात दुचाकी छोट्या चारचाकी या साइडपट्टीवरून मार्ग काढत पुढे सरकतात. पण, पाऊस आल्यास ही साइडपट्टीही बंद होते. कारण त्यात पाणी साठून सारा गोंधळ उडतो. अशातच एखादे अवजड वाहन या साइडपट्टीवरून गेले तर मोठमोठ्या नाल्या पडतात. परिणामी पूर्वीच्या डांबरीकरणातील एकपदरी रस्त्यावरूनच वाहनधारकांना हळूहळू पुढे सरकावे लागते. 

काय म्हणतात जबाबदार 
- या मार्गावर अवजड वाहनांसह स्थानिकांची वर्दळ अधिक असते. त्यातच पर्यायी रस्ता ठीक करता पहिला होता तो रस्ता खोदून ठेवल्याने सायंकाळी येथून जाताना हमखास एक तास लागतो. पूर्ण वाहतूक खोळंबलेली असते. सा. बां.ने ठेकेदाराकडून पर्यायी रस्ता करून घेतला पाहिजे. -डॉ. संजय सरोदे, सीएसएमएस कॉलेज 
 
रस्त्याचे काम होतेय, ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी नागरिक थोडाफार त्रास सहन करायलाही तयार असतात. पण, इथे तीन मिनिटांच्या अंतरासाठी एक-एक तास लागत असेल तर हे अति होत आहे. एक तर काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवली पाहिजे आणि दुसरे म्हणजे पर्यायी रस्ता तयार केला पाहिजे. -संजय नागरगोजे, रहिवासी,नक्षत्रवाडी 
 
ठेकेदाराला पर्यायी रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिथे खड्डा पडेल, तिथे ते तत्काळ मुरूम टाकून रोलिंग करून घेतात. यापुढेही ठेकेदाराला पर्यायी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना देऊ. चौपदरीकरणातील एका बाजूचे काम पूर्ण झाले की बरीच गैरसोय दूर होईल. तोपर्यंत थोडा त्रास होऊ शकतो. -अंकुश गायकवाड, उपअभियंता,सा. बां. विभाग 
बातम्या आणखी आहेत...