आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथवाड्यातील रांजण भरण्यास उद्या प्रारंभ, पंढरपूरनंतर राज्यातील दोन नंबरची यात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पंढरपूरनंतर राज्यातील दोन नंबरची यात्रा म्हणून पैठणच्या नाथ महाराज यांच्या नाथषष्ठीकडे पाहिले जाते. मंगळवारपासून नाथवाड्यातील पवित्र रांजण भरण्यापासून प्रारंभ होत आहे. 

यंदा यात्रेचा निधी वाढला असला तरी यात्रेचे नियोजन पूर्णपणे प्रशासन पाहत असल्याने प्रशासनाची यात दमछाक होताना दिसत आहे. यात्रेमधील वारकऱ्यांच्या सुविधांकडे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, नगराध्यक्ष सूरज लोळगे हे विशेष लक्ष देत असले तरी यंदा पोलिस प्रशासनाने यात्रेमधील प्रमुख आकर्षण असणाऱ्या रहाटपाळण्याला परवानगी नाकारल्याने स्थानिक नागरिकांत काहीशी नाराजी असून काही लोक यात आपले आर्थिक हित पाहत यात्रेतील रहाटपाळण्यास विरोध केल्याची बाब समोर आली आहे. यात नगराध्यक्षाला लक्ष्य करण्याचे काम होत असल्याने  यात्रेचे राजकारण सध्या पैठणमध्ये चर्चेचा विषय ठरत असून यात भाविकांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.  
 
वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल होण्यास होणार प्रारंभ
नाथवाड्यातील पवित्र रांजण भरण्यास सुरुवात संत तुकाराम बीजेच्या दिवशी श्रीखंड्याने ज्या रांजणात नाथरायांच्या घरी पाणी भरले त्या रांजणाच्या पूजेने होते. याच दिवसांपासून पैठण नगरीत राज्यभरातील दिंड्या दाखल होण्यास प्रारंभ होतो. याच  पंचमीच्या दिवशी सर्व पारंपरिक मानकऱ्यांना नाथांच्या सर्व वंशजांतर्फे अक्षत व आमंत्रण दिल्या जाते. नाथषष्ठीच्या पहाटे श्री विजयी पांडुरंगाला महाभिषेक केला जातो आणि श्रीएकनाथषष्ठीच्या मुख्य सोहळ्यास नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी निघते,या मानाच्या दिंडीत इतर दिंड्यांचा सहभाग असतो.  

वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध
यात्रेमध्ये दर वर्षी येणारे रहाटपाळणे हे बच्चे कंपनीसह मोठ्यांचे आकर्षण असते. मात्र काही मंडळी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी रहाटपाळण्यास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यातून पोलिस प्रशासनाने रहाटपाळणे यात्रेमध्ये नकोची भूमिका घेतलीचे राजकारण सध्या पैठणमध्ये रंगत आहे.  

गैरसोय होणार नाही
भाविक, वारकऱ्याची यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे.  आम्ही भाविकाच्या सुविधांकडे लक्ष देणार आहोत. काही मंडळी नहाक रहाटपाळण्याचा मुद्दा पुढे करत आहेत. यात काय स्वार्थ हे कळण्यास मार्ग नाही.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष 

काळजी घेतली जाईल 
पैठणच्या नाथषष्ठी यात्रेची तयारी पूर्ण होत आली आहे. यात्रा मैदानासह इतर ठिकाणी भाविक वारकरी यांच्या तीनदिवसीय मुक्कामाची सोय, शुद्ध पाणी,आरोग्य याची काळजी घेतली जाणार आहे.
- राहुल सूर्यवंशी, मुख्याधिकारी नगर परिषद, पैठण
बातम्या आणखी आहेत...