आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : जायकवाडी प्रकल्पात केवळ 17 टक्के जिवंत साठा शिल्लक, चांगल्या पावसाची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण  - मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात   केवळ १७ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून चांगला पाऊस झाला नाही तर मृतसाठ्यातून मराठवाड्याला तहान भागवावी लागणार आहे. तालुक्यातील हार्षी, खेर्डा, शिवनी, एकतुणी, पारंडी, इनायतपूर, देवगाव हे पाझर तलावांनीही तळ गाठले असल्याने तालुक्यात पुन्हा दोन वर्षांपूर्वीसारखी भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांची तहान ही त्या-त्या भागातील पाझर तलावांवर भागते.  जायकवाडी धरणाच्या पाण्यावर औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील अनेक गावे व पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याची तहान भागते. मात्र, यंदा जायकवाडी धरणातून बेसुमार पाण्याचा उपसा शेतीला झाल्याने शेवटची सातवी पाणी पाळी रद्द करण्यात आली अाहे. आता शिलकी १७ टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार अाहेे.  ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्याने चितेगाव, विहामांडवा, बालानगर, आडूळ या भागातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  आठ दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही तर नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागणार आहे.
 
औरंगाबाद, जालन्याला झळ  
औरंगाबादला रोज १५० तर जालन्याला २२ दलघमी पाणी पिण्यासाठी लागते.  धरण मृत साठ्यावर आले तर या दोन्ही जिल्ह्यांची पाणी कपात करावी लागेल, शिवाय नगर जिल्ह्यातही टंचाई निर्माण होईल.
 
चांगल्या पावसाची प्रतीक्षा  
- पैठण तालुक्यातील बहुतांश जलस्त्रोत आटले असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. चार दिवसांत चांगला पाऊस आला नाही तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालन्याला पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
- अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, पैठण. 
बातम्या आणखी आहेत...