आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत आरक्षणावर भाजपचा आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- नगर पंचायत निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी शासनाच्या वस्तुनिष्ठ अहवालाचे पालन न करता जनतेच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत वॉर्ड रचना व आरक्षण केले असल्याचा आक्षेप स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा संपूर्ण कार्यक्रम नव्याने घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे भाजपच्या वतीने मुख्य निवडणूक आयोगाकडे सोमवारी (२१ सप्टेंबर) करण्यात आली आहे.

सोयगाव नगर पंचायतीचे प्रारूप स्वरूपाचे आराखडे तयार करून विभागीय आयुक्तांकडून मंजूर करवून ते २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आरक्षण सोडत प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रभागात उतरत्या किंवा चढत्या क्रमांकाचा राखीव प्रभाग आहे, याची कल्पना देण्यात आली नाही. प्रभाग रचना करतेवेळी एकाच ठिकाणी बसून कोणतीही शहानिशा न करता आराखडे तयार करण्यात आले. त्यात चतु:सीमा, मुख्य रस्ता, मंदिर, मशीद, शाळा, कॉलेजचा उल्लेख टाळण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ३१ ऑगस्ट २०१५ रोजी हरकत व दावे दाखल करण्यात आले होते. त्यात सुनावणी होऊन उपजिल्हाधिकारी, सोयगावचे तहसीलदार, सोयगावचे मुख्याधिकारी यांना पुन्हा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. या आदेशास बगल देऊन स्थानिक राजकीय मंडळीच्या दबावास बळी पडून जैसे थे अहवाल पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ?
प्रभाग रचनेची मतदार यादी प्रसिद्ध करताना प्रभाग रचनेतील (क्रमांक १ ते १७) जातीनिहाय समतोल न साधता चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले. तसेच मतदार यादी प्रकाशित करताना प्रभागाचा नकाशा, मतदार याद्यांसोबत लोकसंख्या मतदार विवरण प्रकाशित करण्यात आले नाही.

घोळ करणाऱ्यांवर कारवाई करा
नगर पंचायत सोयगावच्या प्रभाग रचना, नकाशे, मतदार याद्यांतील असमतोल व आरक्षण घोळ करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस योगेश मानकर, प्रभारी अनिल खरात, माजी तालुकाध्यक्ष कैलास काळे, माजी सरपंच राजेंद्र जावळे, वसंत बनकर, सुनील गावंडे, शांताराम देसाई यांनी निवडणूक मुख्य आयुक्त, मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.