आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथांच्या नावाने दुसऱ्या दिंडीला विरोध, वंशजांचा वाद वाढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण येथून शुक्रवार, दि. १६ जून रोजी संत एकनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान होणार असून याच दिवशी नाथवंशज छय्या महाराज गोसावी यांची दिंडी निघणार असून या दुसऱ्या दिंडी सोहळ्यास रघुनाथबुवा पांडव यांनी विरोध केला आहे. नाथ महाराज यांच्या नावाने दुसरी पालखी दिंडी त्याच दिवशी व त्याच मार्गे काढली जाऊ नये, अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे रघुनाथबुवा पांडव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
नाथवंशज व दत्तक पुत्र रघुनाथबुवा पालखीवाले यांच्या मागील अनेक वर्षांपासून वंशज वाद सुरू असून तो वेळोवेळी न्यायालयापर्यंत गेला आहे. वर्षभर हा वाद जरी शांत स्वरूपाचा दिसत असला तरी वर्षातून दोन वेळा एक नाथषष्ठी व आषाढी वारीच्या दरम्यान तो वाद उफाळून येतो. यंदा तो अधिक स्वरूपात निर्माण झाल्याने नाथवंशज छय्या महाराज गोसावी यांची  दुसरी दिंडी शुक्रवारी निघणार असून यंदा ते या दिंडीला पालखीचे स्वरूप देत असल्याने या वादात भर पडल्याचे दिसत आहे.  आज रघुनाथबुवा पालखीवाले यांनी या दुसऱ्या पालखीवर आक्षेप घेतला असून न्यायालयाने नाथांच्या नावाने त्याच दिवशी दुसरी पालखी दिंडी काढू नये, असे आदेश दिल्याचा दाखला दिला असून काही नाथवंशज न्यायालयाचा अवमान करत असल्याचे रघुनाथबुवा पालखीवाले यांनी या वेळी सांगितले.

वारकरी संभ्रमित होणार
दोन्ही दिंड्या एकाच दिवशी निघणार असून प्रत्येक दिंडीमध्ये सहभागी होणारे वारकरी ठरावीक असतात. ते आपापल्या दरवर्षीच्या दिंडी प्रमुखाच्या दिंडीत सहभागी होतात. मात्र, जो नवीन येणारा वारकरी यंदा असेल तो कोणत्या दिंडीत सहभागी व्हावे, याविषयी संभ्रमित असेल.

व्यापक स्वरूपातून वाद वाढणार
छय्या महाराज यांनी आम्ही मागील ४५ वर्षांपासून दिंडी काढत असल्याचे सांगितले. मात्र, यंदा याला व्यापक स्वरूप आल्याने रघुनाथबुवा पालखीवाले व नाथवंशज यांच्यात वाद होताना दिसत आहे.  
 
आम्ही अनेक वर्षांपासून नाथांची दिंडी पंढरपूरला घेऊन जातो. दिंडी काढण्यास न्यायालयाने कोणती बंद घातलेली नाही व आम्ही आमची दिंडी शुक्रवारीच दि. १६  जून रोजी काढणार आहोत.
- छय्या महाराज गोसावी, नाथवंशज 
बातम्या आणखी आहेत...