आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'औरंगाबादच्या मापात पाप नाही' चिप वापरून पेट्रोल चोरी होत नसल्याचा पुरवठा अधिकाऱ्यांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर करून पेट्रोल चोरीचा प्रकार लखनऊत उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र, औरंगाबादेत असा प्रकार घडत नसल्याचा दावा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी पंपांची खास तपासणी केलेली नाही. पण याबाबत कोठून तक्रारही आली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, “दिव्य मराठी’ने शहरातील पेट्रोल पंपांची तपासणी केली असता सर्वांकडेच नियमाप्रमाणे आवश्यक पाच लिटरचे माप, फिल्टर पेपर, थर्मामीटर आणि तक्रार रजिस्टर अाढळून आले. ग्राहक तक्रार नोंदवतात, मात्र त्यात “मापात पाप’च्या तक्रारींची संख्या शून्य आहे. 

गेल्या आठवड्यात लखनऊमध्ये चिपचा वापर करून पेट्रोल चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर पंप सील करण्यात आले. या पार्श्वभूमीवर “दिव्य मराठी’ने शुक्रवारी औरंगाबादेतील पेट्रोल पंपांची पाहणी केली. जिल्ह्यात ११५ तर औरंगाबाद शहरात ४३ पेट्रोलपंप आहेत. हे पंप भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आयओसी, एस्सार आणि रिलायन्स कंपनीचे आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम म्हणाले, आम्ही पेट्रोल पंपांची नियमित तपासणी करत असतो. मात्र, चिपचा वापर करून पेट्रोल चोरीचा प्रकार तपासण्यासाठी खास तपासणी केलेली नाही. याबाबत तक्रारही आलेली नाही. औरंगाबादेत असा प्रकार घडत नसल्याचा दावा त्यांनी केला. 

प्रत्येक पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागात त्या-त्या कंपनीच्या सेल्स ऑफिसरचा क्रमांक दिलेला असतो. नागरिकांना शंका आली तर ते त्यावर थेट तक्रार करतात. आमच्याकडेही काही तक्रारी येतात. मात्र, याचे प्रमाण तुरळक आहे. गेल्या वर्षभरात दोन तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्या पेट्रोल कमी मिळाल्याबाबतच्या नसून तेथील सुविधांविषयी होत्या. आम्ही त्यांची पाहणी केली आणि सुविधा पुरवण्यास भाग पाडले, असे कदम म्हणाले. दरम्यान, “दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत पंपांवर पेट्रोलची चोरी थांबवणे आणि गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक बाबी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. 

- उल्कानगरीतील श्री साई शरण ऑटोमोबाइल्समध्ये पाच लिटरचे माप, फिल्टर पेपर, थर्मामीटर, हायड्रोमीटर आणि तक्रार पुस्तिका होती. सहा महिन्यांत एखादा ग्राहक तक्रार नोंदवतो, तर वर्षभरात एखादा ग्राहक भरलेले पेट्रोल मोजून दाखवण्याचा अाग्रह धरतो, असे व्यवस्थापक शेख हकीम यांनी सांगितले. 

- बाबा पेट्रोल पंपात पाच लिटरचे माप, फिल्टर पेपर आणि तक्रार पुस्तिका आहे. तक्रार पुस्तिकेत गर्दी, पेट्रोलचा साठा लवकर संपला, कार्ड चालत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. ग्राहकांना वाटले तर ते थेट सेल्स ऑफिसरकडे तक्रार करू शकतात, असे व्यवस्थापक सचिन कांबळे म्हणाले. 

- चुन्नीलाल पेट्रोल पंपावर पाच लिटरचे माप, फिल्टर पेपर आणि तक्रार पुस्तिका आहे. यापैकी २-३ महिन्यांतून एखादा ग्राहक पेट्रोल कमी आल्याची तक्रार करतो. त्यांना आम्ही पेट्रोल परत काढून मोजून दाखवतो, असे संचालक अशोक खटोड यांनी सांगितले. 

- शहागंजातील ए.पी.पटेल पेट्रोल पंपात रिक्षा आणि दुचाकींची गर्दी असते. येथे ग्राहक तक्रार पुस्तकात गर्दी आणि धक्काबुक्कीची तक्रार करतात. मात्र, हा पंप हेरिटेज वास्तूला खेटून असल्याने शेड किंवा अन्य सुविधा करता येत नसल्याचे व्यवस्थापक गजानन कुलकर्णी म्हणाले. 

- रेल्वेस्टेशन, दिल्ली गेट, उस्मानपुरा, सेव्हन हिल्स आणि क्रांती चौकातील पेट्रोल पंपातही अावश्यक सुविधा आढळल्या. 
बातम्या आणखी आहेत...