आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: पोळा सणात बनोटीत वादाच्या खेळाला खो, आता मोकाट सांड गोऱ्ह्याला दिला मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बनोटी - सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे दरवर्षी पोळा सणात मानपानावरून वाद होऊन दोन ते तीन तास पोळा उशिराने फुटण्याच्या परंपरेला यंदा ग्रामस्थांनी वरिष्ठांच्या मदतीने तोडगा शोधत ना तुझा ना माझा करत थेट गावातून एका मोकाट सांड पकडून त्याला सजवून त्याला पहिला मान देण्याचे ठरवल्याने यंदा बनोटीत प्रथमच वादाविना पोळा सण साजरा झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारी ठरलेल्या वेळेत साडेचार वाजता पोळा फुटला.

   
बनोटी येथे दरवर्षी गावातील जावई असलेल्या व्यक्तीच्या बैलास मान देऊन पोळा फोडण्यात येतो. परंतु गत काही वर्षात गावात अनेक जावई स्थायिक झाल्याने कुणाच्या बैलाला मान द्यावयाचा असा प्रश्न निर्माण झाला. यात नेहमी दरवर्षी मानपानावरून वादाची येथे परंपरा तयार झाली. सतत सात वर्षे येथील पोळा वादात ठरवलेल्या वेळेपेक्षा उशिराने फुटायचा. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी यावर तोडगा काढला. पोळ्याच्या सणात विघ्न येऊन नये म्हणून गावातील मोकाट सांड पकडून त्याला सजवून त्याला पहिला मान देण्याचे ठरले.ठरल्यानंतर दोन दिवसांपूर्वी गावातील काही तरुणांनी सांडाची शोधमोहीम हाती घेतली. सकाळी ११ ते ४ दरम्यान शोधमोहीम राबवली. हाती काही लागले नाही. अखेर पाच वाजता अमृतेश्वर गोमुख संस्थानवर सांड गोऱ्हा आढळला.

त्याला पकडून गावात तिरोनीच्या पाराजवळ बांधले. त्याची खांदेमळणी केली. त्याला जागेवरच चारापाणी केले. या सांड गोऱ्ह्याला सजवण्यासाठी तरुणांची मोठी दमछाक झाली. अखेर दुपारी दोन वाजेपासून पोळ्याचे बैल जमा होऊ लागले. प्रतिष्ठित व ग्रामस्थांसह पोलिसांचे गावात विशेष लक्ष होते. ठरल्याप्रमाणे सायंकाळी चार वाजता या सांड गोऱ्ह्याचे मुख्य दरवाजात पूजन करून पोळा फुटला. सांड गोऱ्ह्याच्या शोधमोहिमेसाठी दोन दिवसांपासून सुमारे गावातील साठ तरुण सहभागी झाले हाेते.

2016- माझ्या पाहुण्यांच्या बैलांना पहिला मान या नादात अनेकांचे वाद होते. त्यामुळे चार वाजता फुटणारा पोळा सायंकाळी ७ वाजता मध्यस्थीने फुटला.  
2015- ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर पोळा असल्याने यात हेवेदावे होत वाद झाले होते. तू याला मदत केली म्हणत अनेक गटात वादामुळे पोळा चर्चेत होता.   
2014- मानापमानाच्या बोलीत कुणीही माघार घेत नसल्याने वाद पेटला होता. दोन गट पडल्याने वाद झाले. ग्रामस्थांच्या मध्यस्थीने दोन तास उशिराने पोळा फुटला.
बातम्या आणखी आहेत...