आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस महानिरीक्षकांकडून पोलिस दलाची झाडाझडती, वाणीसह चौघांच्या कोठडीत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांगरमल(ता. नगर) - दारुकांडातील जणांचे बळी बनावट दारुमुळेच गेल्याचे निष्पन्न झाले आहे. बनावट दारुनिर्मितीचे रॅकेटही उजेडात आले आहे. यातील आरोपींशी काही पोलिसांचे चांगलेच सख्य असल्याचे तपासात समोर आले. संबंधितांची चौकशीही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सोमवारी पोलिस दलाची झाडाझडती घेतली. ते दिवसभर नगरमध्येच तळ ठोकून होते. या गुन्ह्यातील आरोपींशी सख्य असलेल्या पोलिसांवर आता तेच कारवाई करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 
 
पांगरमल येथे राजकीय उमेदवाराने दिलेल्या पार्टीत बनावट दारु प्यायल्यामुळे एकापाठोपाठ जणांचे बळी गेले. याशिवाय पारनेर नगर तालुक्यातील चौघांचेही अतिरिक्त मद्यसेवनामुळे बळी गेले. बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटचे धागेदोरे थेट धुळ्यापर्यंत जाऊन पाेहोचले आहेत. पोलिसांनी धुळ्यातील कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी याला अटक केली आहे. त्यामुळे नगरचे दारुकांड राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. विरोधी पक्षनेते पालकमंत्र्यांनी पांगरमलला भेट देऊन आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तशी प्रक्रियाही सुरू केली आहे. 
 
या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे सोमवारी सकाळीच नगरमध्ये दाखल झाले. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेतली.
 
पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह तपासी अधिकारी आनंद भोईटे या बैठकीला उपस्थित होते. या अधिकाऱ्यांकडून चौबे यांनी पांगरमल दुर्घटनेचा आढावा घेत तपासाची सखोल माहिती घेतली. बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅकेटमधील आरोपींशी काही पोलिसांचे संपर्क असल्याचे त्यांच्याही लक्षात अाले. 
 
बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटमधील आरोपींना ताब्यात घेतले, तेव्हाच त्यांचे काही पोलिसांचे असलेले संबंध उजेडात आले होते. या आरोपींचे काही पोलिसांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचीही वदंता होती. त्यामुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे याबाबत चौकशी सोपवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ते आरोपींचे संपर्क तपासण्याचे काम करत होते.
 
काही संशयितांचीही त्यांनी कसून चौकशी केली. याचा आढावाही त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांपुढे सादर केला. सोमवारी दिवसभर झाडाझडती घेतल्यानंतर आता दोषी पोलिसांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 
वाणीचे वैभव पाहून दिपले डोळे... 
दादा वाणीला पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही जाणून घेतली. वाणीचा धुळ्यात आलिशान बंगला आहे. वाणीची संपत्ती पाहून पोलिसांचेही डोळे दिपले. बंगल्यात त्याचे एक वातानुकूलित केबिन आहे.
 
तो साईबाबांचा भक्त असून केबिनमध्ये बाबांची माेठी फ्रेम आहे. त्यानेच नगरच्या आरोपींना अल्कोहोल स्पिरिट पुरवले. हा माल तो गोव्यातून आणायचा. तो राज्यभरात बहुतांश ठिकाणी मद्यतस्करी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
दादा वाणीविरुद्ध अकरा गुन्हे दाखल 
दादा वाणी हा कुख्यात मद्यतस्कर असून त्याच्याविरुद्ध आतापर्यंत अकरा गुन्ह्यांची नोंद आहे, असे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. आश्चर्य म्हणजे नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याच्या पंधरा दिवसांपूर्वीच धुळ्याच्या उत्पादन शुल्क विभागाने त्याच्या अवैध गोदामावर छापा टाकला होता. या छाप्यात अवैध दारुचे सुमारे शंभर बॅरल, ड्रम जप्त करण्यात आले. तरीही त्याच्या धंद्यात खंड पडलेला नव्हता. छापे पडूनही त्याचा धंदा सुरूच असल्याचे तपासात समोर अाले. 
 
दारूचे ते बॉक्स कोठे गेले...? 
पोलिसांनीसुरूवातीलाच पांगरमलमधून दारुचे काही बॉक्स जप्त केले होते. मात्र, भीमराज आव्हाडने दिलेल्या कबुलीनुसार तेथे जास्त बॉक्स नेलेले होते. जप्त बॉक्सची संख्या कमी असल्याने पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली. त्यावर उर्वरित बॉक्स आव्हाड दाम्पत्याने इतरत्र फेकून दिल्याचे किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी लपवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या बॉक्सच्या शोधासाठी दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली. 
 
चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ 
दादा वाणी, पं. स. सदस्य मंगल आव्हाड, त्यांचा पती महादेव आव्हाड, भरत जोशी, मोहन दुगल संदीप दुगल यांची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी कोठडीत वाढ करण्याची विनंती उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी वाणी, आव्हाड दाम्पत्य जोशीची कोठडी मार्चपर्यंत वाढवली, तर मोहन संदीप दुगल यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 
 
धुळ्यातून आले वकील 
दादावाणीला नगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली. सोमवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. वाणी याच्या वतीने न्यायालयात काम पाहण्यासाठी खास धुळ्याहून काही वकील नगरमध्ये दाखल झाले. वाणीने आरोपींना स्पिरीट पुरवले असले, तरी ते कशासाठी वापरायचे, याला तो कसा काय जबाबदार असू शकतो, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी सोमवारी न्यायालयात केला. 
बातम्या आणखी आहेत...