आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉरी मॅडम, माफ करा.. चूक झाली, अदखलपात्र गुन्ह्यात वृद्धास तीन दिवस डांबले कोठडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- परिमंडळच्या पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यातील कोठडीतील संशयीतांची विचारपूस केली असता घरगुती वादात अदखलपात्र गुन्ह्यात एका वृद्धाला तब्बल तीन दिवस कोठडीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कानउघडणी करत वृद्धाची माफी मागण्याचे आदेश दिले. या प्रकरामुळे पोलिस अधिकाऱ्यामधील माणुसकीसह निर्दयतेचे दर्शनही घडले.

द्वारका परिसरातली दोघा भावांमध्ये मालमत्ता वाटपाचा वाद असून, या प्रकरणी दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यातील ‘दबंग’ पोलिसांनी त्या वृद्धास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवले. पाहणीत हा प्रकार उघड झाल्यावर अंबिका यांनी वृद्धाची अास्थेवाईक चौकशी करून तात्काळ कोठडीबाहेर काढण्याचे आदेश दिले. तसेच वरिष्ठ निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढत पुन्हा असा प्रकार होता कामा नये, अशी तंबी दिली. अशा वागण्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे असे सांगत सर्वांना माफी मागण्याचेही आदेश दिले. एकीकडे क्रूर वागणूक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची माणुसकी या दोन्ही घटनांमुळे वृद्धाला पोलिसांच्या चांगल्या-वाईट प्रवृत्तीचे दर्शन घडले. वृद्धाने एन. अंबिका यांना हात जोडत आणि अश्रू पुसत घराची वाट धरली.