आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांच्या मुलासाठी सायबर सेलने अख्खे शहर पिंजून काढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस शहरात राबवत असलेल्या ऑपरेशन ऑलआऊटची खूप चर्चा आहे. मात्र, दहा वर्षांच्या बोलताही येणाऱ्या एका मुलासाठी सायबर सेलच्या पथकाने शुक्रवारी अख्खे शहर पिंजून काढले अन् खऱ्या अर्थाने हे पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट सार्थक झाले. दुरावलेल्या मुलगा पाच तासांनी परत भेटताच त्याची आई सुखावली. 
 
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक दहा वर्षांचा मुलगा रडत-रडत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आला. गणवेशातील पोलिस कर्मचारी बघून तो घाबरला. साध्या वेशात असणारे सायबर सेलचे कर्मचारी गोकुळ कुत्तरवाडे तेथेच होते. या मुलाने त्यांचा जाऊन हात धरला. कुत्तरवाडे यांनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला बोलता येत नसल्याचे समजले. 
 
कुत्तरवाडे यांनी भेदरलेल्या मुलाला चहा-बिस्किट आणि नाष्टा दिला. पोलिसांनी त्याच्या आईचा शोध घेण्याचे ठरवत त्याला गाडीत बसवले. तो हात दाखवेल तिथे पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत होते. घाटीत एक महिला हरवलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा शोध घेत असल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला अन् आईला पाहताच तो मुलगा तिच्याकडे झेपावला. 
 
घाटीत सुरू होते उपचार : काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने या मुलावर उपचार सुरू होते. त्यासाठीच हे कुटुंब घाटीत आले असता हा मुलगा आईचा हात सोडून रस्ता भरकटल्याचे समोर आले. या मुलाच्या आईचा शोध घेण्यासाठी गोकुळ कुत्तरवाडे यांच्यासह निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, धुडकू खरे, नितीन चव्हाण, अतुल तुपे, धनंजय सानप यांच्या पथकाने प्रयत्न केले. सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी या पथकाला मार्गदर्शन केले
बातम्या आणखी आहेत...