आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिली पोस्ट पेमेंट बँक औरंगाबादेत, ग्रामीण भागात पोस्टमन करणार कॅिशअरचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राष्ट्रीयीकृत बँकांच्या रांगेत लवकरच पोस्टाची नॅशनल पोस्ट पेमेंट बँक येणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून देशभरात मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील ५० बँकांपैकी एक बँक औरंगाबादमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोस्टमन हँड हेल्ड डिव्हाइसच्या माध्यमातून कॅशिअरचे काम करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक, असे या बँकेचे नाव असणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच या बँकेचे कामकाज चालणार आहे. बचत खात्यातील ठेवीवरील व्याजदर अजून निश्चित झाला नसला तरी बँकिंंग क्षेत्रात जोरदार एंट्री करण्यासाठी पहिले वर्ष इतर बँकांपेक्षा आकर्षक व्याजदर ठेवला जाणार आहे.

आयपीपीबी या पायलट प्रोजेक्टअंतर्गत देशभरात पोस्टाच्या ६५० बँका सुरू केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशात एकूण ५० बँका सुरू केल्या जाणार आहेत. याच टप्प्यात औरंगाबादलाही बँक सुरू होत आहे. या बँकेसाठी स्वतंत्र व्यवस्थापक, ऑपरेशनल स्टाफ, कॅशिअर व इतर लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबादेत भडकल गेट शेजारी असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसच्या आवारातच या बँकेसाठी जागा निश्चित झाली आहे. येथूनच कारभार चालणार आहे.

असे चालणार कामकाज
पोस्टमनच ग्रामीण भागामध्ये कॅशिअरचे काम करणार आहेत. एसटी बस कंडक्टरसारखे पोस्टमनला हँड हेल्ड डिव्हाइस दिले जाईल. व्यवहार कसा पूर्ण करायचा, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. एखाद्या खातेदाराला खात्यामध्ये पैसे जमा करायचे असल्यास केवळ पोस्टमनकडे जाणे, स्लिप भरून पैसे देणे, पैसे दिले की लगेच पोस्टमन त्या हँड हेल्ड डिव्हाइसच्या माध्यमातून संबंधिताच्या खात्यावर पैसे जमा करेल. त्याची यंत्रवत पोचपावतीही मिळेल. पैसे काढण्यासाठी सुद्धा अशीच प्रक्रिया असेल. जमा झालेले पैसे पोस्टमन नियमितपणे मुख्य कार्यालयाकडे जमा करेल.
 
या ग्राहकांवर नजर
या बँकेने पेन्शनर, नोकरदार, छोटे व्यावसायिक, रोजंदारी कामगार, गृहिणी, विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, पीओएसबी कस्टमर्स असे घटक डोळ्यांसमोर ठेवले अाहेत. बँक खाते नसणाऱ्यांना बँकिंंगच्या प्रवाहात आणणे आणि व्यावसायिक, नोकरदारांच्या माध्यमातून खेळते भांडवल वाढवणे, हे बँकेचे उद्दिष्ट आहे. या बँकेतून तूर्तास कर्ज मिळणार नाही.
 
या मिळतील सुविधा
या बँकेकडून एटीएम, मोबाइल बँकिंंग, इंटरनेट बँकिंंग, डिजिटल वॅालेट्स आणि व्यावसायिकांना पीओएस मशीन्स दिल्या जाणार आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर या सुविधा आवश्यकच आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी किती सक्षम पणे होतेय, यावरच या बँकेचे यश अवलंबून आहे.

उत्तम सेवेस तत्पर
बँकेच्या माध्यमातून आम्ही सर्वाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. ग्राहकांना त्रास होणार नाही.’
- प्रणव कुमार, पोस्टमास्टर जनरल.

आकर्षक व्याज
शासनाच्या सर्व योजनांचे अनुदान बँकेमार्फत वाटप केले जाईल. ठेवीवरदेखील आकर्षक व्याज मिळणार आहे.’
-असदुद्दीन शेख, सहायक अधीक्षक, पोस्ट