आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: खासगी सावकाराला बेड्या, दहा हजारांचे दीड लाख वसूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या पंचवटी येथील एका सावकाराला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मंगळवारी (दि. १४) पंचवटी पोलिसांच्या पथकाने रामवाडी परिसरात ही कारवाई केली. संशयिताच्या विरोधात सावकारी कायदा प्रतिबंध कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी सावकारावर प्रथमच कारवाई झाल्याने पंचवटी परिसरात अवैध सावकारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि हरीश ठक्कर (रा. शिंदेनगर, पंचवटी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दोन वर्षांपूर्वी खासगी सावकारी करणारा विनोद चव्हाण (रा. रामवाडी) यांच्याकडून घरगुती कारणासाठी पैशांची गरज असल्याने दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यावर चक्रवाढ व्याज लावून एक लाख ५० हजार रुपये घेतले. ठक्कर यांचा मित्र राजू घोडके याच्याकडून सहा हजारांच्या मोबदल्यात दीड लाख रुपये वसूल केले. तरीही संशयित चव्हाण दोघांना जिवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करत होता. 
 
शनिवारी (दि. ११) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मालेगाव स्टँडकडून मखमलाबादकडे पायी जात असताना संशयित चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी पाठीमागून येत मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत खिशात ठेवलेले मुलाच्या शाळेच्या फीचे पाच हजार आणि हातातील घड्याळ बळजबरीने काढून घेतले. सोडवण्यासाठी आलेल्या राजू घोडके यास मारहाण करत त्यालाही चाकूचा धाक दाखवत तीन हजारांची रक्कम काढून घेतली. व्याजाचे पैसे दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ठक्कर आणि घोडके यांनी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्याकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. प्रकार गंभीर असल्याने तत्काळ संशयितांवर कारवाई करत रामवाडीत अटक केली. 
 
तक्रारदारांनी पुढे यावे 
खासगीसावकाराकडूनपैशांसाठी तगादा लावला जात असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. अशा सावकारांच्या विरोधात कारवाई केली जाईल. पंचवटी परिसरात खासगी सावकारीच्या अनेक तक्रारी आहेत. लवकरच या सावकारांवर कारवाई केली जाईल. -लक्ष्मीकांत पाटील, उपअायुक्त, परिमंडळ 
बातम्या आणखी आहेत...