Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Privet Company Water Supply But This Year, MNP Condition Down Why?

खासगी कंपनीने दुष्काळात पाणी दिले, यंदा मनपाकडून औरंगाबादकरांचे हाल का?

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 07:54 AM IST

  • खासगी कंपनीने दुष्काळात पाणी दिले, यंदा मनपाकडून औरंगाबादकरांचे हाल का?
औरंगाबाद-वर्षभरापूर्वी खासगी कंपनीने ऐन दुष्काळात पाणी दिले. मग यावर्षी जायकवाडीत मुबलक साठा असूनही पाण्यासाठी लोकांचे हाल कशासाठी? टंचाई होऊ नये, याकरिता काय नियोजन केले, असा सवाल करत गुरुवारी मनपा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. त्यात महिला आघाडीवर होत्या. त्यांनी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना घेराव घातला. दुर्गावतार धारण करण्यास भाग पाडू नका, असा इशारा माधुरी अदवंत यांनी दिला.
राजू वैद्य यांनी पाण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबत स्थायी समिती सदस्य सभागृह नेता गजानन मनगटे यांनी महापौरांना पत्र दिल्यानंतरही सभा घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नगरसचिव दिलीप सूर्यवंशी यांनी किती दिवसांत सभा घ्यावी, असा नियम नसल्याचे सांगितले. मात्र, भाजपचे दिलीप थोरात यांनी वैद्य यांचाच मुद्दा मांडल्यावर महापौर भगवान घडामोडे यांनी हीच सभा विशेष सभा समजून पाण्याविषयी चर्चेची सूचना केली. त्यानुसार राजू शिंदे यांनी मनपा प्रांतिक अधिनियम १९४९ च्या ६७ (३) कलमाचा आधार घेऊन भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. प्रमोद राठोड, नंदू घोडेले यांनी वारंवार निविदा काढूनही फिरकणारे ठेकेदार ६७ (३) सी कलमानुसार होणारी कामे कशी करतात, असा सवाल केला. तेव्हा अत्यावश्यक कामे म्हणून ६७ (३) सी मध्ये पाणीपुरवठ्याची कामे करतो, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया म्हणाले. काही नगरसेवकांनी समांतरचे काम करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी चांगली होती, असेही म्हटले. सभागृह नेता गजानन मनगटे यांनी पाणीटंचाईग्रस्त लोकांना चहल यांच्या घरी घेऊन जाऊ, असे सांगितले.
सीमा खरात यांच्या नेतृत्वात ज्योती पिंजरकर, शिल्पाराणी वाडकर, सुनीता आऊलवार, मीना गायके, अर्चना नीळकंठ, शोभा वळसे, समीना शेख, मनीषा मुंढे, संगीता वाघुले, सायली जमादार, शोभा बुरांडे, सुरेखा सानप, विमल केंद्रे यांच्यासह सर्वपक्षीय महिला नगरसेवकांनी चहल यांना घेराव घातला. त्यावर चहल यांनी दोन दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असे उत्तर दिले. तर पुढील बैठकीत पाणी समस्या, उपाययोजनांचे नियोजन करून यावे, अशी सूचना महापौरांनी केली.
बिल्डरला पाणी कसे? : उपमहापौर घोगरे
उपमहापौर स्मिता घोगरे यांनी माझ्या वॉर्डातील एका जुन्या वस्तीला कमी आणि बिल्डरच्या वसाहतीला मुबलक पाणी का देता, असा सवाल केला. तेव्हा या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. मनपाकडे डाटा नसल्याने पाणीपट्टी भरण्यात अडचण येत असल्याचे रामेश्वर भादवे म्हणाले. त्यावर मालमत्ता पाणीपट्टीसाठी एकच रजिस्टर क्रमांक देण्याचा मानस बकोरियांनी व्यक्त केला.

Next Article

Recommended