आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: वर्षभरापासून पाणीच दिले नाही, प्रियदर्शिनी उद्यान झाले भकास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमजीएम कॅम्पसमधील प्रियदर्शिनी उद्यान भकास झाले आहे. गेल्या वर्षभरापासून झाडांना पाणी दिले जात नसल्याने ती वाळत आहेत. पाणी आहे, पाइपलाइन आहे, पण मोटार नाही. खेळण्या सुस्थितीत आहेत, पण लाइट नाही. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन मद्यपी पार्ट्या करतात. सकाळी जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांनादेखील घाण पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. मनपाने लक्ष दिल्यास या उद्यानाचा विकास होऊ शकतो. 

एमजीएम कॅम्पसमधील २२ एकर परिसरामधील प्रियदर्शिनी उद्यान फार पूर्वी सिडकोच्या ताब्यात होते. नंतर एमजीएमने त्याचा विकास केला. आता ते मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले. एमजीएम संस्थेने उद्यानामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी पाइपलाइन केलेली आहे. त्यांच्याकडे उद्यानाचा ताबा असताना मोटारीद्वारे दररोज झाडांना पाणी दिले जात होते. मात्र, मनपाकडे ताबा आल्यानंतर एमजीएमने मोटार काढून घेतली. त्याला आता एक वर्ष लोटले, परंतु या एक वर्षामध्ये मनपाने मोटार लावली नसल्याने शोभेच्या झाडांना पाणी मिळत नसल्याने ती वाळत आहेत. 

खेळणी चांगली, पण दिवेच नाहीत: लहान मुलांसाठी उद्यानामध्ये असलेली सर्व खेळणी सुस्थितीत आहेत. तसेच येथील जॉगिंग ट्रॅकची स्थितीदेखील चांगली आहे. मात्र, येथे लाइटची कोणतीच व्यवस्था केली नसल्याने रात्रीच्या वेळी इथे कोणीच फिरकत नाही. 

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त: उद्यानामध्ये ड्रेनेजचे पाणी येऊन त्याचा छोटासा तलाव झाला आहे. याच तलावातून मोटारीद्वारे झाडांना पाणी दिले जात होते. मात्र, या तलावातील घाण पाण्यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. 

टवाळखोरांचा धुडगूस: हे उद्यान सकाळी नऊ वाजेपर्यंत खुले असते. त्यानंतर प्रमुख गेट बंद करण्यात येते. मात्र, एमजीएम संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या तार कंपाउंडमधून टवाळखोर मुले आत शिरतात. त्यातही रात्रीच्या वेळी येथे दिवे नसल्याने मद्यपींच्या दारूच्या पार्ट्या होतात. उद्यानातील हौदामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येतो. 

उद्यानामध्ये जुनी पाइपलाइन आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांमध्ये मोटार बसवण्यात येऊन झाडांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात येईल.
- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा

या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. त्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत अाहे. तत्पूर्वी लवकरच उद्यानामध्ये नवीन पाइपलाइन टाकण्यात येईल व लाइटचीदेखील सोय होईल.  
- प्रशांत देसरडा, नगरसेवक

आमचा एमजीएम मॉर्निंग वॉक ग्रुप आहे. आम्ही दररोज सकाळी या उद्यानामध्ये वॉकिंगसाठी येतो. मात्र, आता उन्हाळा सुरू होण्याच्या मार्गावर असतानाही येथील झाडांना पाणी दिले जात नसल्याने झाडे वाळण्याची शक्यता आहे. एकीकडे शहरामध्ये मोेठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे अभियान राबवले जातात, तर दुसरीकडे अशा उद्यानांमधील झाडांचे संगोपन केले जात नाही. मनपाने तातडीने मोटार बसवून झाडांना जीवदान देणे गरजेचे आहे. तसेच उद्यानामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने आम्हाला दररोज दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
- संजय परिहार, उमेश मेने, विनोद भट्टड, राजीव सांगळे, रवी शर्मा
बातम्या आणखी आहेत...