आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापक दांपत्याने मुकुंदवाडीत अनाथाश्रमामध्ये फुलवला मळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वांग्याच्या झाडाला लागलेली पाच-पन्नास वांगी टोपलीत जमा केली. लगोलग पत्ताकोबी, फुलकोबी, कोथिंबीर, भेंडी, तुरीच्या शेंगा, हादगा, मोसंबी, पपई, लिंब, अंजीर आणि बोरेही तोडली... सोबत पूजेसाठी सर्व प्रकारची फुलेही घेतली. शिवाय जनावरांसाठी घासही कापला... हे कुठल्या शेतातले किंवा फळबागेतील वर्णन नाही, तर अनाथाश्रम परिसरात अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक बी. यू. राठोड आणि त्यांच्या पत्नी प्रा. अनिता राठोड यांनी परिश्रमातून फुलवलेल्या मळ्यातील खरेखुरे दृश्य आहे. त्यांनी कचरा आणि खरकट्यापासून पोषक खत तयार केले आणि हा मळा फुलवला. येथील सर्व फळे-फुले, भाजीपाला आश्रमातील मुलांसाठी पिकवला जातो. यासोबतच त्यांनी वीज बचतीच्या दृष्टीने इमारतीबाहेर सौर दिवेही लावले आहेत. ग्रामीण भागातील, तांड्या-वस्त्यांमधील अनाथ मुलांना सुखवस्तू कुटुंबाप्रमाणे त्यांनी सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्यामुळेच त्यांचे कार्य दखलपात्र आहे. 
 
प्रा. बी. यू. राठोड हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रामपूरतांड्याचे. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पूर्ण केले. विद्यार्थिदशेत होणाऱ्या हालअपेष्टा पाहून त्यांनी १९८० मध्येच आदिवासी विमुक्त जाती विकास शिक्षण संस्थेची स्थापना केली. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांना औरंगाबादेतील वसंतराव नाईक महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली आणि औरंगाबादेतच स्थायिक झाले. आदिवासी भागातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटत होते. हा उद्देश साध्य करण्यासाठी २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वृद्धाश्रम चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, खूप विचार केल्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाऐवजी अनाथ बालकांसाठी बालकाश्रम सुरू करण्याचे ठरवले.
 
यासाठी त्यांनी मुकुंदवाडी परिसरात अर्धा एकर जागा घेतली. त्यापैकी सहा हजार चौरस फूट जागेत दोन मजली इमारत बांधली. अशा प्रकारे त्यांनी ते १८ वर्षे वयाेगटातील अनाथ बालकांच्या विकासासाठी उर्वरित आयुष्य घालवण्याचा संकल्प केला. 

अधिकाऱ्यांकडूनही कौतुक 
ज्यामुक्या प्राण्यांच्या मलमूत्राचा खतासाठी वापर केला जातो, त्यांच्यासाठी चारा-पाण्याचीदेखील सोय येथेच केली. त्यांच्यासाठी ऊस, बाजरी, ज्वारी, मका आणि घासाची लागवड केली आहे. राज्यातील महिला बालविकास विभाग तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महिला बाल विकास आयुक्त, जिल्हा बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त इत्यादी अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले आहे. तसेच राज्यातील निरीक्षण आणि बालगृहांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार असे प्रयोग राबवण्याच्या सूचनाही केल्या. लवकरच महिला बालविकास विभागामार्फत हा निर्णय प्रसिद्ध केला जाईल, असे प्रा. राठोड यांनी सांगितले. 

मुलांच्या गरजांकडे विशेष लक्ष 
प्रा.राठोड यांनी अनाथआश्रमातील मुलांना सुखवस्तू कुटुंबासारख्या सुखसोई उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षण, खेळ, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सगळी साधने पुरवण्यात आली आहेत. मुलांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून सोलार वॉटर हिटर बसवले. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या विजेची बचत व्हावी या मूळ उद्देशातून सोलार ऊर्जा बचत दिवेदेखील आश्रम परिसरात लावले आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण इमारतीमध्येही सौर ऊर्जेद्वारे सर्व उपकरणे चालवण्याचे कामही सुरू केले आहे. 

नैसर्गिक खतावर घेतात पीक 
महिलाबाल विकास प्रकल्पाकडून अनाथआश्रम चालवणाऱ्या संस्थांना प्रतिदिन प्रतिबालकामागे ४० रुपये अनुदान मिळते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या संस्थांना अनुदान मिळाले नाही. दुसरीकडे सर्व रोगांचे मूळ पाणी, अन्न, रासायनिक खतांवर पिकवलेल्या भाज्या असतात. हे लक्षात घेऊन या परिसरातच १० गुंठे जागेत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर करता शेणखत, झाडांचा पालापाचोळा, कचरा आणि खरकटे सहा महिने एका खड्ड्यात सडवून केलेल्या नैसर्गिक खतावर भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. या माध्यमातून तयार केलेल्या सेंद्रिय खतापासून सर्व प्रकारच्या भाज्यांची आणि फळांची रोपटी लावून बाग फुलवली. मुलांना रोज ताजे दूध मिळावे यासाठी गायी, म्हशी, शेळ्या पाळल्या आणि मुलांना देशी अंडी मिळावीत म्हणून कोंबड्यादेखील पाळल्या. 

मळ्यात पिकतात ही फळे, भाजीपाला 
राठोडसरांच्या बागेत टोमॅटो, शेवगा, अंबाडी, अबईच्या शेंगा, हादग्याची फुले, कांदा, लसूण, भेंडी, वांगी, गवारीच्या शेंगा, मेथी, पालक, काेथिंबीर, हिरवी मिरची, पत्ताकोबी, फुलकोबी, तूर, चवळी, मूग, उडीद, भुईमुगाच्या शेंगा, कडीपत्ता इत्यादी सर्वप्रकारचा भाजीपाला पिकतो. तर बागेमध्ये त्यांनी केळी, चिकू, मोसंबी, पपई, लिंबू, अंजीर, सीताफळ, डाळिंबाची लागवड केली आहे. एवढेच नाही तर तुळशी, सब्जा, पिंपळ, वड, उंबर, नारळ, बेल, चिंच, लिंब आणि विविध वनौषधींची झाडे लावून ऑक्सिजन हबदेखील निर्माण करण्यात आला आहे. 

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी प्रयत्नशील 
मुलेखासगी शिकवणीपासून वंचित राहू नयेत म्हणून शहरातील खासगी क्लास घेणाऱ्या संस्थांना भेटून त्यांनी मुलांना प्रवेश मिळवून दिला. त्याचप्रमाणे इंग्रजीसारख्या अांतरराष्ट्रीय भाषेचे ज्ञान मुलांना अवगत व्हावे यासाठी औरंगाबादेत एका नामांकित कंपनीतील जर्मन शिक्षिका मार्शा आठवड्यातून दोनदा मुलांना मोफत इंग्रजीचे धडे देतात. मुलांचे शैक्षणिक साहित्य, कपडे, भांडी गहाळ होऊ नये. तसेच प्रत्येकाच्या खोलीत मोकळे वातावरण राहावे यासाठी दर्जेदार फर्निचरची लॉकर सिस्टिम बसवण्यात आली आहे. 

आमचा आश्रम स्वर्गाहून सुंदर 
जन्मएकदाच येतो. मृत्यूनंतर सोबत काय घेऊन जाणार? या प्रश्नाचे उत्तर एकच, पुनर्जन्मावर आमचा विश्वास नाही. याच जन्मात स्वत:बरोबर इतरांनाही जगण्याचा आनंद देत जीवनाचा प्रत्येक क्षण घालवण्यामध्ये आनंद मिळतो. त्यामुळे आमचा आश्रम स्वर्गाहूनही सुंदर आहे. प्रा.बी. यू. राठोड, अनिता राठोड 
 
बातम्या आणखी आहेत...