आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुकटचा पगार घेतोय, काम द्या; बांधकाम उपअभियंत्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहा महिन्यांपासून सरकारचा फुकट पगार घेतो आहोत, निष्क्रियतेचा कलंक आमच्यावर लागू नये म्हणून मायबाप सरकार, आम्हाला काम द्या, अशी याचना करणारे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपअभियंत्यांनी मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शिवसेना-भाजपतील कुरघोडीच्या राजकारणातून पैठणला नव्याने उपविभाग स्थापन झाला असून, त्यांच्याकडे कामेच नाहीत. त्यामुळे नेत्यांच्या चढाओढीत अधिकाऱ्यांचा बळी जात असल्याचे या पत्रामुळे उजेडात आले आहे.

तीर्थक्षेत्र पैठणला नाथषष्ठीला ६ लाखांवर भाविक येतात. त्यामुळे येथे बांधकाम खात्याचा नवा उपविभाग करण्याची शक्कल भाजपच्या गोटातून पुढे आली होती. उपविभागासाठी पाच कोटींच्या कामांना मंजुरीही देण्यात आली. अभियंत्यांसह १० कर्मचाऱ्यांची नेमणूक उपविभागासाठी झाली. परंतु दहा महिने उलटूनही कर्मचाऱ्यांना काहीच काम नाही. कारण उपविभागाला वाटप केलेली कामे पूर्वीचे दोन उपविभाग म्हणजे सा.बां. उपविभाग पैठण आणि उपविभाग दक्षिण हेच करत आहेत. म्हणजे सध्या कागदोपत्रीच नव्या योजनेचे नाव असून जुन्याच उपविभागामार्फत कामे सुरू आहेत. भविष्यात या कामांची चौकशी झाल्यास आपण गोत्यात येऊ, अशी भिती नव्याने रुजू झालेले उपअभियंता बी.डी. साळवे यांनी मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे. ४ सप्टेंबर रोजी त्यांनी हे लेखी पत्र पाठवले आहे.
कार्यकारी अभियंत्यांवर आरोप
उपअिभयंता साळवे यांनी मुख्य अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात गंभीर मुद्दे आहेत. विभागाचे कार्यकारी अभियंता पी.आय. सुखदेवे यांच्यावरच त्यांनी थेट आरोप केले आहेत. नव्या उपविभागाच्या कामाचे व कार्यक्षेत्राचे वाटप करण्याचा अधीक्षक अभियंत्यांचा आदेश असतानाही सुखदेव टाळाटाळ करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

युतीच्या नेत्यांत चढाओढ उपविभागाची गरज काय; भूमरेंचेही पत्र
पैठणमधील काही गावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे त्यांनी पैठणला नव्या उपविभागाची निर्मिती लावून धरली. त्यातूनच पैठण तीर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी विभागाचे राज्याचे सचिव आनंद कुलकर्णी यांनी कन्नडच्या उपविभागाचे पैठण क्रमांक ३ असे नामांतर करून हा उपविभाग कार्यन्वीत केला. परंतु श्रेय आणि फायदा भाजपला मिळेल याचा अंदाज येताच पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी या उपविभागालाच विरोध केला. नवी चाल खेळत भुमरे यांनी या उपविभागाची गरजच नसल्याचे पत्र बांधकाम विभागाचे मुख्य अभितंया प्रवीण किडे यांना दिले.
आठ दिवसांत निर्णय
दरम्यान, आमदार भूमरे यांचे पत्र आले असून, कागदपत्रे तपासत आहोत. आठवडाभरात या प्रश्नी तोडगा काढला जाईल, असे मुख्य अभियंता किडे यांनी म्हटले आहे. गरज असेल तर हा उपविभाग कार्यन्वीत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदेशाप्रमाणे काम देऊ
तिसऱ्या उपविभागाचा वाद आहे. सक्षम अभियंतेही नाहीत. त्यांच्याकडे पदभार देण्यास विलंब होत आहे. तथापि, मुख्य अभियंत्यांकडे उपअभियंत्यांनी तक्रार केली असली तरी जो आदेश येईल तसे काम सोपवले जाईल.
पी. आय. सुखदेवे, कार्यकारी अभियंता